वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी विषयक मार्गदर्शन

वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “अमली पदार्थांचे दुष्परिणाम व सायबर गुन्हेगारी” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. निसर्ग ओतारी तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेचे पर्यवेक्षक श्री. रवी थोरात यांनी केले. यानंतर श्री. ओतारी यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा घातक व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक असून, अमली पदार्थांशी संबंधित बेकायदेशीर कृत्यांमुळे कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल होऊ शकतात, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केले.

तसेच वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी शेअर करण्याचे धोके, सोशल मीडिया गैरवापर आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबतही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचा लाभ शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भविष्याची दिशा देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!