मुलांना जगण्याची कला शिकवा – रवींद्र खेबुडकर

कुंभारवाडी शाळेत शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात

बैलगाडी मिरवणूक, औक्षण करून मुलांचे स्वागत

मुलांना साईन कॉस्ट थिटा शिकवाच पण कसं जगायचं हे देखील त्यांना शिकवा. थोडक्यात त्यांना जगण्याची कला शिकवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले. येथील पीएमश्री जि प प्राथामिक शाळा कुंभारवाडा या शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या शाळेत पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या मुलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप देखील शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले.
दीड महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर आज पासून जिल्हाभरातील शाळांची घंटा पुन्हा वाजली. येथील पीएमश्री जिल्हा परिषद कुंभारवाडा शाळेत सुद्धा आजपासून मुलांचा किलबिलाट सुरु झाला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालक यांनी नवीन विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत केले. नासिर यांच्या सजवलेल्या बैलगाडीतून मुलांची मिरवणूक काढण्यात आली. मुलांच्याच बँड तालावर या बैलगाडीतून मुलं शाळेच्या ठिकाणी आली. शिक्षक गुरुप्रसाद सावंत यांनी या बैलगाडीचे सारथ्य केले. त्यावेळी मुलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गट शिक्षणाधिकारी कैलास राऊत, नगरसेविका आफरीन करोल, गणेश भोगटे आणि शिक्षकांनी औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनतर कुंकुमजलामध्ये पाय बुडवून मुलाच्या पायाचे ठसे कागदावर घेण्यात आले. शाळेत प्रवेश केल्यावर मुलांनी देवी सरस्वतीला नमस्कार करून आशीर्वाद देखील घेतले.
केळबाई मंदिरच्या हॉलमध्ये प्रवेशोत्सवाचा मुख्य सोहळा संपन्न झाला. यावेळी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी रवीन्द्र खेबुडकर, सहाय्यक बीडीओ प्रवीण हिर्लेकर, गट शिक्षणाधिकरी कैलास राऊत, नगरसेविका आफरीन करोल, नगरसेवक गणेश भोगटे, केंद्र प्रमुख महेश परुळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रद्धा देसाई, मुख्याध्यापिका सायली कदम, माजी मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत, श्री. सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठयपुस्तके संचाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रवींद्र खेबुडकर यांनी एकाच रंगाच्या गणवेशात असलेल्या प्रशालेच्या शिक्षक वृंदाचे विशेष कौतुक केले. सर्वाना सामान पातळीवर ठेवणारी हि फार मोठी संकल्पना असल्याचे त्यानी सांगितले. मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच जगण्याची कला शिकवा असे आवाहन त्यांनी पालक आणि शिक्षकांना केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जन्मदर राज्यात सगळ्यात कमी आहे. त्यामुळे पटसंख्या कमी होत चालली आहे. शाळा बंद पडू लागल्या आहेत. पण जे अतिरिक्त शिक्षक असतील त्यांना जिल्ह्यातच कसे सामावून घेता येईल याचा विचार प्रशासन करत आहे असे त्यांनी सांगितले. आज शिक्षणमध्ये नावीन्य येत आहे. नवीन शैक्षणिक धोरण येते आहे. एआयचा वापर होऊ लागलाय. जग बदलते आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा काही गोष्टी शिकणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला जिल्हा आहे जो एआययुक्त जिल्हा आहे. अशा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणून काम करताना अभिमान वाटतो, असे श्री. खेबुडकर म्हणाले. शिक्षक, पालक आणि मुलांनी तंत्रज्ञान अवगत करा. ते नाही केलं तर आपण पाठीमागे पडू अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त होऊनही प्रवेशोत्सवासाठी अपार मेहनत घेणाऱ्या या शाळेच्या निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत यांचा रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत स्वप्नाली सावंत आणि इतर शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा गावडे यांनी केले. या प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्ताने नव्याने दाखल झालेल्या मुलानी आपल्या विविध कला सादर केल्या. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सायली कदम, चैत्राली पाटील, ऋतुजा गावडे, स्वराली लाड, वंदना परब, गौरी गोसावी, दिपाली मोहिते, गुरुप्रसाद सावंत तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!