अंजिवडे घाटासाठी हेवेदावे विसरून एकत्र येऊया !

कृती समिती अध्यक्ष ऍड. किशोर शिरोडकर यांचे आवाहन
घाट कृती समितीची माणगावात बैठक
बहुप्रतिक्षित आणि माणगाव खोऱ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या अंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता सर्वांनी हेवेदावे आणि पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन आजिवडे घाट कृती समितीचे अध्यक्ष ॲड. किशोर शिरोडकर यांनी केले.
माणगाव येथील बाळ केसरकर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये आयोजित अंजिवडे घाट कृती समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे एम. के. गावडे, प्रभाकर परब, नंदन वेगुर्लेकर, सगुण धुरी, आर. के. सावंत, आनंद मेस्त्री, सुभाष भिसे, मोहन सावंत, प्रज्ञा परब, सौ. श्रेया परब, साई नार्वेकर, बाळ केसरकर, अजित परब, अनिल वायंगणकर आदीसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करताना, हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा नसून संपूर्ण जनतेचा आहे, त्यामुळे एकजुटीने काम केले तरच यश येईल,असा सूर लावून धरला.
अंजिवडे घाटाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी व्यापक आणि राज्यपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा स्तर, सातारा आणि मुंबई या तीनही स्तरांवर एकाच वेळी जोरदार पाठपुरावा करणे अत्यंत आवश्यक असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी सुरुवातीला आ. निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना या समस्येचे गांभीर्य पटवून देण्याचे व साकडे घालण्याचे निश्चित झाले आहे.
अंजिवडे घाट रस्ता हा या भागाचे भविष्य बदलणारा ठरणार आहे. हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर रेंगाळू नये म्हणून सर्वांची ताकद एकाच छताखाली येणे गरजेचे आहे. आपण एकत्र आलो, तरच हा घाट रस्ता लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो. असे देखील ॲड. किशोर शिरोडकर यांनी सांगितले.





