सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण बस स्थानकाचा ‘मॉडेल बस स्थानक’ म्हणून विकास करणार – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य

कणकवली शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी घेतली परिवहन मंत्री यांची भेट

खारेपाटण एस टी बसस्थानक बाबत लेखी निवेदन केले सादर

खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार असून, गोवा, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचे आणि गजबजलेले ठिकाण आहे. दररोज हजारो प्रवासी, पर्यटक, विद्यार्थी आणि नागरिक या बस स्थानकाचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांची नुकतीच कणकवली शिवसेना तालुका प्रमुख श्री. मंगेश गुरव यांनी भेट घेऊन खारेपाटण एस टी बसस्थानक बाबत लेखी निवेदन सादर केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या
खारेपाटण शहरातील एस टी बस स्थानकाचा मॉडेल बस स्थानक म्हणून विकास करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
नामदार सरनाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,देवगड व सावंतवाडी या बस स्थानकाची पाहणी करण्याकरिता जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी देवगड आंबेरी पुलावर त्यांचे शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी स्वागत केले. तर शासकीय विश्रामगृह देवगड येथे खारेपाटण बस स्थानक बाबत लेखी निवेदन दिले. यावेळी माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना तालुका प्रमुख संदेश पटेल आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नामदार श्री. प्रताप सरनाईक यांनी तातडीने लेखी निवेदनाची दाखल घेत महामंडळाच्या मंत्रालयीन वरिष्ट अधिकाऱ्यांना खारेपाटण व फोंडाघाट या दोन बस स्थानकांचा मॉडेल बस स्थानक यादीत समावेश करण्यात याव्या. अशा सूचना दिल्या. व लवकरच खारेपाटण एस टी बस स्थानकाचा कायापालट करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सद्यस्थितीत खारेपाटण बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, खारेपाटण बस स्थानकाचा कायापालट करून त्याचा ‘मॉडेल बस स्थानक’ म्हणून विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे –
​१. बस स्थानकाचे काँक्रीटीकरण: पावसाळ्यात बस स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल होतो आणि खड्डे पडतात. प्रवाशांना आणि बस चालकांना होणारा हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी संपूर्ण बस स्थानक परिसराचे तातडीने काँक्रीटीकरण करण्यात यावे.
​२. सर्व अद्ययावत सोयी-सुविधा: बस स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी आधुनिक आसन व्यवस्था, सुसज्ज आणि स्वच्छ स्वच्छतागृहे (महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र) आणि रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था (हायमास्ट दिवे) उभारण्यात यावी.
​३. आरक्षण (Reservation) सुविधा: खारेपाटण येथून मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच लांब पल्ल्याच्या अनेक बसेस सुटतात व जातात. येथील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर कायमस्वरूपी आणि अद्ययावत संगणकीकृत आरक्षण खिडकी (Reservation Counter) सुरू करण्यात यावी.
​४. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर: विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांचे पाण्यासाठी हाल होतात. यासाठी बस स्थानकावर शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ ‘वॉटर कुलर विद प्युरिफायर’ बसवण्यात यावे.
​५. रिक्षा थांब्यासाठी जागा: बस स्थानकाच्या परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील बाजूस दोन लाइन ची जागा व बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या जागेत शिस्तबद्ध रिक्षा थांब्यासाठी (Rickshaw Stand) जागा आरक्षित करून तिचा विकास करण्यात यावा.


        "खारेपाटण हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्याने या बस स्थानकाचा चेहरामोहरा बदलल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभवात नक्कीच भर पडेल. परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी लोकहितार्थ आणि महत्त्वाच्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन खारेपाटण बस स्थानकाला 'मॉडेल बस स्थानक' म्हणून मंजुरी द्यावी. आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती. अश्या मागणी चे निवेदन श्री. मंगेश गुरव शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख यांनी केले आहे.
error: Content is protected !!