कणकवली च्या सुपुत्राची देशाच्या क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी

अवघ्या 12 वर्षाच्या मंथन उकर्डे याने आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप मध्ये मिळवले पहिल्या सहा मध्ये स्थान

पालकमंत्री नितेश राणेंकडून कणकवलीच्या सुपुत्राला आर्थिक पाठबळ देत प्रोत्साहन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंथन चा केला सत्कार

कणकवली तालुक्यातील 12 वर्षाच्या मंथन पराग उकर्डे या सुपुत्राने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले असून, आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या चायना हॉंगकॉंग येथील पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत प्रत्येक गटाकरिता संपूर्ण देशभरातून दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामधील भारतातून या स्पर्धेकरिता 12 वर्षीय वयोगटामध्ये मंथन उकर्डे याची निवड करण्यात आली. मंथन यांने हॉंगकॉंग येथे झालेल्या या आशियाई स्पर्धेमध्ये सहावे स्थान प्राप्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्या व त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ही गौरवास्पद बाब आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे विशेष कौतुक केले जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मंथन उकर्डे याला या हॉंगकॉंग येथील स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आर्थिक मदत करत त्याला प्रोत्साहन दिले. उकर्डे कुटुंबीयांनी देखील पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. कणकवली तालुक्यातील कलमठ कोष्टीवाडी येथील मंथन उकर्डे मुंबई ताडदेव येथे स्थायीक असून त्याचे शिक्षण क्राईस्ट चर्च स्कूल भायखळा येथे सुरू आहे. त्याच्यात लपलेला खेळाडू हा त्याच्या आई-वडिलांनी ओळखला व ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक मध्ये मंथन याला सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले . या स्पर्धेची पहिली निवड चाचणी ही 18 व 19 एप्रिल 2026 रोजी चेन्नई येथे झाली होती. मिनी एज ग्रुप मध्ये 12 वर्षाच्या मंथन याने या निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. व त्यानंतर चायना हॉंगकॉंग येथे होणाऱ्या दुसऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप करिता त्याची भारतातून निवड झाली. भारतातील विविध वयोगटामधून 32 स्पर्धकांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. या 32 खेळाडूंची टीम नुकतीच 20 मे 2026 रोजी चायना हॉंगकॉंग येथे रवाना झाली. 23 व 24 मे रोजी हॉंगकॉंग येथे आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये आशियाई देशातील खेळाडूंमधून मंथन उकर्डे याने सहावे स्थान प्राप्त करत यश संपादन केले. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्टेट चॅम्पियनशिप मध्ये मंथन यांने गोल्ड मेडल मिळवले होते. मंथन हा मुंबई येथे शिक्षण घेत असून त्याचे आजोळ हे कणकवली कनकनगर माजी सेवानिवृत्त शिक्षिका रश्मी हर्णे यांच्याकडे आहे. तर कलमठ कोष्टीवाडी या ठिकाणी मंथन याचे घर असून, मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदी नुकतीच नियुक्ती झालेले कलमठ चे सुपुत्र पराग अशोक उकर्डे व कणकवली शहरात माहेर असलेल्या मुंबईतील माध्यमिक शिक्षिका सिद्धी पराग उकर्डे यांचा मंथन हा सुपुत्र होय. मंथन याने आता नोव्हेंबर 2026 मध्ये होऊ घातलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये यश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होत देशाचे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करण्याचा मंथन याने निर्धार व्यक्त केला आहे. कणकवलीत मंथन येथे आगमन झाल्यानंतर त्याने कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेतली. नलावडे यांनी मंथन याचा सत्कार करत त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच पालकमंत्री नितेश राणे यांची देखील भेट घेत त्यांचे आभार मानणार असल्याचे मंथन व त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!