छेड काढल्याप्रकरणी “त्या” परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन

संशयितांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. संशयितांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
शहरातील परी हेअर अँड ब्युटी सलूनमध्ये मूळ पंजाब राज्यामधील सदरचे दोन युबक कामाला होते. पीडित युवती आणि तिची बहीण रस्त्याने चालत जात असताना या दोन्ही संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. एवढचावरच न थांबता संशयितांनी पीडित युवतीचा हात धरून ओढला आणि मनात लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील वर्तन केले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करण्याचे अधिनियम (पोक्सो) कलम ८ आणि १२, तसेच भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, ७८, ३५१ (२) सह ३ (५) कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच संशयिताना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर संशियातांतर्फे जामिनासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही संशयितांना प्रत्येकी ५० हजारांच्या जामिनावर मुक्तता करताना गुन्ह्याच्या तपासात ढवळाढवळ करू नये, तपासात सहकार्य करावे आदी अटी घातल्या आहेत.





