इंधन दरवाढीचा भडका!

पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांना झटका
सार्वजनिक तेल शुद्धीकरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून तात्काळ लागू करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांनंतर प्रथमच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवरही झाला असून, दरवाढ अपरिहार्य असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असली, तरी ती सर्वत्र समान असणार नाही. प्रत्येक राज्यातील कररचना आणि वाहतूक खर्चानुसार दर वेगवेगळे असतील. मात्र, सर्वसाधारणपणे ही वाढ तीन ते पाच रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





