कणकवलीत एका सलून मध्ये कामाला असलेल्या परप्रांतीय युवकांकडून अल्पवयीन युवतींची छेडछाड

संतप्त ग्रामस्थांकडून परप्रांतीय युवकांना चोप

शहरातील दोन अल्पवयीन युवतींची छेडछाड केल्याच्या आरोपावरून संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. यासोबतच जोपर्यंत त्या युवकांना रस्त्यावरून चालत घेऊन जात नाही तोपर्यंत आपण हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थ व संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी घेतला. यावर पोलीस प्रशासनाने 50 मीटर पर्यंत पोलीस फाट्याच्या ताफ्यातून चालत घेऊन जात. पोलीस जीप गाडीत बसवत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शहरातील तेलीआळी मार्गावरून दोन अल्पवयीन युवती जात असताना, जवळील नावाजलेल्या सलूनमध्ये काम करणाऱ्या काही परप्रांतीय युवकांनी त्यांच्याशी अश्लील वर्तन करत मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. युवतींनी त्यांना तत्काळ सुनावले.मात्र त्यानंतरही संबंधित युवकांनी पुन्हा छेडछाड केल्याचे सांगितले जाते.
घडलेला प्रकार युवतींनी आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर संतप्त नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी संबंधित युवक राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना बाहेर काढत जाब विचारला. यावेळी संतप्त जमावाकडून युवकांना मारहाण करण्यात आली. या घटनेत काही युवक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकांची जमावाच्या तावडीतून सुटका केली व त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर गर्दी करत संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
घटनास्थळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक राकेश राणे, नगरसेविका मेघा गांगण यांच्यासह मनस्वी ठाणेकर, सौरभ पारकर,गौरव हर्णे, औदुंबर राणे,मिथून ठाणेकर, सोनू भंडारी,उमेश आरोलकर,भाऊ आरोलकर,चेतन अंधारी, अमेय पारकर,जावेद शेख, नवू झेमने, यांच्यासह मोठ्या संख्येने तेलीआळी, हर्णे आळी व शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते. घटनेदरम्यान परिसरात बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. यानंतर पोलीस स्थानीकादेखील राजकीय लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकवटले होते.

error: Content is protected !!