ओंकार हत्तीचा बांदा परिसरात धुमाकूळ

दुचाकींची मोडतोड, ग्रामस्थांमध्ये भीती

वाफोलीत ओंकार हत्तीचा वावर

दोडामार्ग तालुक्यातील कुलझर परिसरातून झोळंबे, भालावल आणि डेगवे मार्गे प्रवास करत ओंकार हत्तीने पुन्हा बांदा परिसराकडे मोर्चा वळवला आहे. बुधवारी सकाळी हा हत्ती वाफोली आणि आईरवाडी परिसरात दाखल झाला. तेरेखोल नदीपात्रात मनसोक्त डुंबत त्याने काही काळ मुक्काम ठोकला.
दरम्यान, वाफोली आडवाडी येथे उभ्या असलेल्या दोन दुचाकींवर हल्ला करत हत्तीने त्यांचे नुकसान केले. याआधीही भालावल परिसरात मोटारीची मोडतोड केल्याची घटना घडली होती.
ओंकार हत्ती नदी पार करून इन्सुली गावाच्या दिशेने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून वनविभागाचे पथक त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. गोव्याच्या कळणे मार्गे कोलझर परिसरात गेलेला हा हत्ती पुन्हा तांबोळी, डेगवे आणि मोयझरवाडी मार्गे बांदा परिसरात दाखल झाला आहे.
सोमवारी रात्री त्याचा वावर बांदा-वाफोली रस्त्यावरील जेसीबी कंपनीजवळ दिसून आला होता. त्यानंतर रात्रभर वाफोलीतील आडवाडी आणि आईरवाडी परिसरात तो फिरत होता.
हत्ती पुन्हा गावात दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!