गिर्ये बुद्धविहार वर्धापन दिन उत्साहात

सिंधुदुर्ग राज्यात ठरला पहिला जिल्हा
जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय
देवगड तालुक्यातील मौजे गिर्ये येथील बुद्धविहाराच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना मला विशेष आनंद झाला. बुद्धविहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि एकतेचे प्रेरणास्थान आहे, असे मत यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय वस्तींची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला असून, हा उपक्रम पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. सामाजिक सन्मान आणि स्वाभिमान जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.
बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून जिल्हा नियोजन समिती, समाजकल्याण विभाग आणि विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच आमच्या सरकारचे ध्येय असल्याचे यावेळी सांगितले.
गिर्ये येथील बौद्ध समाजाची एकजूट, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून समाजाने विकासकामांमध्ये घेतलेला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक सलोखा आणि विकासाचा संदेश देणारे असे कार्यक्रम समाजाला नवी दिशा देतात, असेही यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमास माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, डॉ. भीमराव आंबेडकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





