66 लाख लाडक्या बहिणी अपात्र ; सरकारने बंद केला 1500 रुपयांचा सन्मान निधी

66 लाख लाडक्या बहिणींचा सन्मान निधी बंद ; सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्व काळात सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या तब्बल 66 लाख महिलांचा सन्मान निधी बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू केली होती.
या प्रक्रियेदरम्यान लाभार्थींना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी शासनाने चार वेळा मुदतवाढही दिली. अखेर 30 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत संपल्यानंतर सरकारने अपात्र महिलांचा सन्मान निधी थांबवण्याचा निर्णय घेतला.
पडताळणीनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील 66 लाख महिला अपात्र ठरल्या असून आता केवळ 1 कोटी 77 लाख महिला या योजनेसाठी पात्र राहिल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात फक्त पात्र महिलांनाच दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
अंतिम पडताळणीपूर्वी या योजनेसाठी राज्य सरकारला दरमहा सुमारे 3600 कोटी रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे.





