महाराष्ट्र सागरी विकासाच्या दिशेने मोठी झेप

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी केंद्र बनविण्यासाठी ५६ हजार १७ कोटींच्या करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने केलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील सागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने राज्यातील बंदर विकास, जहाज बांधणी, जलवाहतूक आणि सागरी उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत १९ सामंजस्य करार केले आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची सागरी क्षमता लक्षात घेऊन राज्याला जागतिक सागरी केंद्र बनवण्यासाठी सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देत कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या बैठकीला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.





