रो-रो बोट सेवा बंद

जादा तिकीट दरांमुळे प्रवाशांनी फिरवली पाठ?
राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली रो-रो बोट सेवा अखेर बंद पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. या सेवेसाठी शासनाकडून प्रत्येक फेरीमागे मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात होते, मात्र प्रवाशांना अपेक्षित सवलत मिळाली नसल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, “जर या बोट सेवेचे तिकीट दर ८०० ते १००० रुपयांच्या दरम्यान ठेवले असते, तर निश्चितच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असता. मात्र वाढीव तिकीट दर आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली.”
मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली ही सेवा इंजिन बिघाडाचे कारण देत बंद करण्यात आली. मात्र याच कंपनीची सेवा मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावर सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
याशिवाय, या प्रकल्पासाठी कर्मचारी नियुक्ती, तसेच विजयदुर्ग येथे विशेष व्यवस्था उभारण्यात आली होती. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा उल्लेख करत, “हा खर्च प्रवाशांच्या सुविधांसाठी होता की अन्य कारणांसाठी?” असा सवालही उपरकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जहाज बांधणी कारखान्याच्या प्रस्तावावरूनही त्यांनी टीका करत, “एक घोषणा पूर्ण होण्याआधी दुसरी घोषणा केली जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक योजना अपुऱ्या नियोजनामुळे अडचणीत येताना दिसत आहेत,” असे म्हटले.
जिल्ह्याच्या विकासापेक्षा केवळ घोषणांवर भर दिला जात असल्याची टीका करत, भविष्यात अशाच प्रकल्पांची अवस्था रो-रो सेवेसारखी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया देखील उपरकर यांनी दिली.





