कोकणाची लाडकी ‘स्वामीलीला’ थांबली

मालवण आगारात भावनिक निरोप
प्रवाशांच्या डोळ्यांत अश्रू
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालवण आगारातील MH40 N 9209 क्रमांकाची आणि प्रवाशांच्या मनात “स्वामीलीला” म्हणून घर केलेली खास एसटी बस अखेर सेवेतून निवृत्त झाली आहे. अनेक वर्षे कोकणवासीयांच्या सुख-दुःखाच्या प्रवासाची साक्षीदार ठरलेली ही बस थांबताच मालवण आगारात भावनिक वातावरण निर्माण झाले.
निरोप समारंभावेळी चालक, वाहक, कर्मचारी आणि अनेक जुन्या प्रवाशांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसले. कारण “स्वामीलीला” ही केवळ एक एसटी नव्हती… ती हजारो आठवणी जपणारी प्रवासातील जिवलग सोबती होती.
शाळा–कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी शहर गाठणारे युवक, सण-उत्सवासाठी गावाकडे परतणारी कुटुंबे, तर कधी आप्तांच्या सुखदुःखात धाव घेणारे प्रवासी… प्रत्येकाच्या आयुष्यात या बसने एक वेगळी जागा निर्माण केली होती.
कोकणातील अवघड घाटरस्ते, मुसळधार पाऊस, धुक्याने भरलेले वळणावळणाचे मार्ग आणि लांब पल्ल्याचे प्रवास… प्रत्येक परिस्थितीत “स्वामीलीला”ने विश्वासाने सेवा बजावली. अनेक चालक आणि वाहकांनी वर्षानुवर्षे या गाडीबरोबर काम करताना तिच्याशी भावनिक नाते जोडले होते.
“स्वामीलीला आली का?” हा प्रश्न मालवण आगारात अनेकदा ऐकायला मिळायचा. प्रवासी बस क्रमांकाने नव्हे, तर तिच्या नावानेच चौकशी करत असत. तिच्या आगमनाने स्थानकात एक वेगळीच ओळख आणि उत्साह निर्माण होत असे.
आज तिच्या सेवानिवृत्तीची बातमी समोर येताच अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एका ज्येष्ठ प्रवाशाने भावना व्यक्त करत सांगितले, “या बसमधून आम्ही कित्येकदा मुंबई गाठली… मुलांना शिक्षणासाठी पाठवलं… गावच्या सणांसाठी परतलो… आज ती थांबली म्हणजे आयुष्यातील एक सुंदर अध्याय संपल्यासारखं वाटतंय.”
काळ बदलत जाईल… नवीन गाड्या येतील… आधुनिक सुविधा वाढतील… मात्र “स्वामीलीला”ने दिलेला जिव्हाळा आणि तिच्याशी जोडलेल्या असंख्य आठवणी कायम जिवंत राहणार आहेत. आज तिचे चाक थांबले असले, तरी अनेकांच्या मनात तिचा प्रवास कधीच थांबणार नाही.
या भावनिक निरोप समारंभप्रसंगी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, चालक ए. के. चिरमुले, वाहक एच. डी. मसुरकर, एसटी प्रेमी प्रवासी मित्र अनंत शांताराम सामंत, प्रणिता गुरुदास कावले, पल्लवी प्रमोद सामंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, यांत्रिक विभाग, सुरक्षारक्षक, वाहन परीक्षक, इंधन लिपिक आणि अनेक प्रवासी उपस्थित होते.





