घरासमोरील कारची हत्तीकडून तोडफोड;

‘ओंकार’मुळे पुन्हा भीतीचे वातावरण

दशक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. भलावह येथील लोहारवाडीत एका घरासमोर उभी असलेली ईर्टिका कार हत्तीने मोठ्या प्रमाणात फोडून नुकसान केले. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास ओंकार हत्तीने विकास मंगेश गुळेकर यांच्या मालकीच्या ईर्टिका कारला लक्ष्य केले. हत्तीने कारला जोरदार धडक देत दोन वेळा उलटवण्याचाही प्रयत्न केला. मोठा आवाज झाल्याने गुळेकर कुटुंबीय जागे झाले. मात्र, हत्तीच्या भीतीमुळे कोणीही बाहेर जाण्याचे धाडस केले नाही. सर्वजण घराच्या खिडकीतून व स्लॅबवरून हा थरार पाहत होते.
सुमारे अर्धा तास हत्ती कारची तोडफोड करत होता. त्यानंतर शेजारी राहणारे मनोहर गुळेकर यांच्या दुचाकीचेही नुकसान करून ओंकार तांबोळी गावाच्या दिशेने निघून गेला.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभर भालावल-तांबोळी सीमेवरील गुरू गावडे यांच्या काजू बागायत परिसरात ओंकारचा वावर असल्याचे दिसून आले. सायंकाळी उशिरापर्यंत तो तांबोळी-झोळंबे परिसरातील जंगलात असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच बांदावन परिमंडळाचे वनपाल एन. बी. खराटे यांनी वनरक्षकांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांकडून माहिती घेतली.

error: Content is protected !!