देवबाग समुद्रकिनारी दुर्दैवी घटना

मुलाला वाचवताना मच्छीमाराचा समुद्रात बुडून मृत्यू

मालवण तालुक्यातील देवबाग समुद्रकिनारी शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. समुद्रात बुडणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात झेपावलेल्या मच्छीमार रावजी उर्फ काका अवधूत चोपडेकर (रा. देवबाग, चोपडेकरवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास देवबाग समुद्रकिनारी एक अल्पवयीन मुलगा समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच परिसरात उपस्थित असलेल्या रावजी उर्फ काका चोपडेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात झेप घेत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी धाडसाने मुलाचा जीव वाचवला; मात्र या बचावकार्यादरम्यान स्वतःचा तोल जाऊन ते समुद्राच्या लाटांमध्ये अडकले. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका जीवाला वाचवताना दुसरा जीव गमावल्याने देवबाग गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच देवबाग ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून रावजी उर्फ काका चोपडेकर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!