जेष्ठ गझलकार, कवी, लेखक, पत्रकार कै. मधुसुदन नानिवडेकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त ११ जुलै रोजी “मधुस्मृती” कार्यक्रमाचे आयोजन

सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक, आणि जेष्ठ पत्रकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता “मधुस्मृती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संवाद परिवार आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने तळेरे येथील दळवी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.
कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या चिरंतन स्मृती जागृत राहाव्यात आणि त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल विद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि नवोदित साहित्यिकांना माहिती व्हावी यासाठी नानिवडेकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त “मधुस्मृती” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार, प्रसिद्ध लेखिका व गझलकार सौ.माधुरी चव्हाण- जोशी तसेच गोव्यातील साहित्यिक डॉ.सौ.अनुजा काळे- जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
११ जुलै रोजी सुरुवातीला सकाळी ९.४५ वाजता चैतन्य नर्सिंग होम तळेरे येथील मधुकट्टयावरती प्रथम नानिवडेकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता दळवी महाविद्यालयाच्या सभागृहात कै. मधुसुदन नानिवडेकर यांच्या कविता आणि गझलांची मैफिल रंगणार आहे. तसेच मान्यवरांचे मनोगत असा सार्थ श्रद्धांजली वाहणारा आणि त्यांच्या आठवणी जागविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी या मधुस्मृती कार्यक्रमाला तमाम साहित्य प्रेमी, नानिवडेकर प्रेमी आणि नवोदित साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.






