‘आवर्तना’त रंगला रघुकुल स्वरविहारचा १३ वा वर्धापन दिन

रागदारीवर आधारित रचनांनी रसिकांवर स्वराभिषेक
वर्धापन दिन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती
एखाद्या शहराला सांस्कृतिक चेहरा प्राप्त होत जातो, तेव्हा त्या शहराची वेगळी ओळख निर्माण होते. त्या शहरातील नागरिकही कला अंगाने समृद्ध होत जातात. अश्याच सावंतवाडी शहरातील शास्रोक्त अर्थात शास्त्रीय संगीताचे उत्तम धडे देणाऱ्या “रघुकुल स्वरविहार” संस्थेला ११ एप्रिल २०२६ रोजी १३वर्षे पूर्ण झाली. त्याच औचित्य साधून रविवारी १२ एप्रिलला रघुकुल स्वरविहार संस्थेचा वर्धापन दिन सावंतवाडीत भटवाडीयेथील श्री मंगल कार्यालय इथं सांगितीक मैफिलीने उत्साहात पार पडला.
“आवर्तन-स्वर-ताल-रचनांची भक्तीपूर्ण मैफिल” या शीर्षकांतर्गत हा सोहळा संपन्न झाला. शास्त्रीय संगीतात महत्वाचा असलेला “आवर्तन” हा शब्द. आवर्तन म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आणि पुनरावृत्ती. संगीतामध्ये रियाज हा एक अखंड प्रवास आहे आणि रियाजातील सातत्यपूर्ण साधना म्हणजे आवर्तन होय अस म्हणता येईल. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी किरण सिद्धये, आबा कशाळीकर, सीए लक्ष्मण नाईक, व्यवस्थापक दिनकर परब, संजय गावडे, संस्थेच्या माजी शिष्या सौ. भाग्यश्री कशाळीकर, रघुकुल स्वरविहारच्या संचालिका सौ. ईश्वरी तेजम अर्थात नूतन परब उपस्थित होत्या. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेमध्ये सातत्याने रियाज केला जात आहे. या निरंतर साधनेमुळे साधकांमध्ये संगीताची आवड, निष्ठा आणि प्रगती घडत आली आहे. प्रत्येक वर्षी होणारा हा कार्यक्रम म्हणजे या रियाजाच्या आवर्तनाचेच एक सुंदर प्रतीक आहे. रियाजाच आवर्तन म्हणजे स्वर-राग-ताल आणि रचना यांचा पुन:पुन्हा केलेला सराव होय. या सातत्यपूर्ण साधनेमुळे कलाकारांच्या कलेत परिपक्वता येते. सुरुवातीला कठीण वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू सुलभ होतात आणि सादरीकरण अधिक प्रभावी बनते, याचाच प्रत्यय रसिकांना काल झालेल्या “आवर्तन स्वर-ताल-रचनांची भक्तिपूर्ण मैफील” यामध्ये घेता आला.
या संस्थेमध्ये वय वर्ष सात ते पन्नास वयापर्यंतचे शिष्य शास्त्रोक्त पद्धतीने धडे घेत आहेत आणि वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात याच शिष्यांचा सहभाग होता. सर्वात आधी रघुकुल स्वरविहारच्या माजी शिष्या आणि आधारस्तंभ असणाऱ्या कै. अनला मोघे व सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण आदरांजली देण्यात आली. त्यानंतर मैफिलीची सुरुवात रघुकुल स्वरविहारच्या शिष्यांनी राग केदार मधील चतरंग या प्रकाराने केली. त्यानंतर राग यमन मधील बंदिश, ग्वाल्हेर घराण्याचे काही निवडक गानप्रकार, हिंदुस्थानी ख्याल गायन, शिर्डी के साईबाबा हे भक्तीपूर्ण हिंदी भजन सादर करण्यात आले.
जि. प. प्राथमिक शाळा क्र. ६ सावंतवाडी चा इ. दुसरीतील विद्यार्थी कु. हर्षवर्धन गुरुप्रसाद तेजम याने एकल तबला वादन सादर केले रघुकुल स्वरविहार संस्थेच्या संचालिका सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) यांनी राग मालकंस सादर केला आणि तद्नंतर राग भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संजय कात्रे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाला तबला साथ अथर्व पिळणकर आणि हार्मोनियम साथ कु. मंगेश मेस्त्री यांनी दिली. ध्वनीव्यवस्थापन हेमंत मेस्त्री यांचं होत. अशा प्रकारे रघुकुल स्वरविहार संस्थेच्या १३ व्या सांगितीक आवर्तनाची सांगता आणि १४व्या सांगितीक आवर्तनाचा शुभारंभ झाला.





