सिंधु ऍग्रो असोसिएशन आयोजित कृषी विक्रेता संघटनेची जिल्हास्तरीय सभा संपन्न

जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांची संघटना सिंधुदुर्ग ऍग्रो मार्केटीयर्स असोसिएशनची सभा हॉटेल अनंत कणकवली येथे संपन्न झाली. विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत सहकार्याची भूमिका राहिलेली आहे. शेतकरी आणि विक्रेत्यांचे नाते खूप जवळचे असून परस्परांविषयी जिव्हाळा प्रेम आणि संवादाचे वातावरण आहे.आजपर्यंत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांच्या गरजेनुसार उधारीवर साठा पुरवठा केलेला आहे.
यावर्षी हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना आंबा व काजू पिकावर झालेल्या परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्र पातळीवरील आमच्या संघटनेमार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय कृषिमंत्री महोदय यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरता निवेदन सुद्धा देण्यात आलेली आहे. स्थानिक पातळीवर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सन्मा. खासदार यांना बागायतदारांना जास्तीत आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि पाठपुरावा पण सुरु आहे.
खराब हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला असून विक्रेते शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
आजच्या सभेमध्ये यावर्षी झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विक्रेत्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून सहानुभूतीपूर्वक सहमतीने व्यवहार ठरवावा व शेतकऱ्यांची सुसंवाद साधावा असा ठराव करण्यात आला व शेतकऱ्यांनी 15 जून पर्यंत उधारीची रक्कम पूर्ण करावी अशी शेतकऱ्यांना विनंती करण्याचा ठराव झाला तसेच विक्रेत्यांनी यापुढे रोखीने व्यवहार करावा असा मतप्रवाह पुढे आला. विक्रेत्यांवर होत असलेल्या नाहक आरोपाबद्दल सदर सभेमध्ये प्रखर नाराजी व्यक्त करण्यात आली.जिल्ह्यात आमच्या विक्रेत्यांकडून बोगस अथवा अनधिकृत पीक संरक्षण औषधे विकली जात नाहीत. कोणताही विक्रेता अधिकतम विक्री किमतीने विक्री करत नसून शेतकऱ्यांना वाजवी दराने विक्री करत आलेला आहे. मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची मनमानी विक्रेत्यांकडून करण्यात येत नाही याउलट उधारीवर दिलेल्या साठ्यावर सुद्धा विशेष सवलत शेतकरी मागत असतात आणि तशी ती त्याप्रमाणे दिली जाते. जिल्ह्यामध्ये बाहेरून येऊन परस्पर शेतकऱ्यांकडे विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याविषयी मागणी करणे बाबत चर्चेत ठरले.





