पत्नीच्या मृत्यू प्रकरणात संशयीत आरोपी सचिन मानेला न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. भूषण बिसुरे व ॲड. नेहा ताम्हणकर यांचा युक्तिवाद

स्मिता माने मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलीस सचिन माने याच्या पोलीस कोठडी मुदत संपल्याने त्याला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास यंत्रणेकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ओरस एस पी पाटील यांनी पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयाने संशयित आरोपी सचिन माने याला न्यायालयीन कोठडी दिली. आरोपीच्या वतीने ॲड. भूषण बिसुरे व ॲड. नेहा ताम्हणकर यांनी युक्तिवाद केला. स्मिता माने यांचा मृतदेह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे शवविच्छेदन करण्यात आला. मात्र, मृत्यूचे निश्चित कारण न देता व्हिसेरा जतन करून ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात “Evidence of pressure mark around neck in advanced decomposed body samples kept for viscera and accessory examination reports” अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे व्हिसेरा आणि अन्य तपासणी अहवाल महत्त्वाचे ठरणार आहेत.
या प्रकरणातील आरोपीला १३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. ही मुदत संपत असल्याने आरोपीची पोलीस कोठडी आणखी पाच दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. मात्र संशयित आरोपीच्या वतीने ॲड. नेहा ताम्हणकर यांनी युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!