कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणार्या अन्यायाबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी उठवला दिल्लीत आवाज

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणार्या विशेष रेल्वेंच्या बाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना एक सविस्तर पत्र सुपूर्द केले व मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या पत्रात खा. अरविंद सावंत यांनी आकडेवारीसह मध्य रेल्वेचा दुजाभाव उघड केला आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की:
• कोकणच्या वाट्याला केवळ ३६ गाड्या: मध्य रेल्वेने १९ मार्गांवरून अंदाजे १,५०० ‘समर स्पेशल’ (उन्हाळी विशेष) गाड्यांचे नियोजन केले आहे. यापैकी तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी आणि ३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या आहेत. याउलट, मुंबईतून लाखो चाकरमानी ज्या कोकणात प्रवास करतात, त्या मार्गावर (मडगाव व्हाया कोकण) केवळ ३६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
• उत्तर भारतासाठी रोज, तर कोकणासाठी आठवड्यातून एकदाच: एप्रिल महिन्यात ‘सीएसएमटी-गोरखपूर’ (CSMT-Gorakhpur) विशेष गाडी दररोज धावणार आहे, तर ‘सीएसएमटी-मडगाव’ (CSMT-Madgaon) ही गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान केवळ आठवड्यातून एकदा (गुरुवारी) धावणार आहे.
• नियमित गाड्या हाऊसफुल्ल: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस यांसारख्या नियमित गाड्यांचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या प्रवासासाठी मांडवी आणि कोकण कन्या एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लासची ‘वेटिंग लिस्ट’ १०० च्या पुढे गेली आहे.
जनआंदोलनाचा इशारा:
सध्याचे रस्ते, घाटांचे अवघड मार्ग आणि वाहतूक कोंडी यामुळे रस्ते प्रवास सोयीचा व सुरक्षित राहिलेला नाही, अशा वेळी रेल्वेने कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे. मध्य रेल्वेच्या या उत्तर भारत-केंद्रित (North-centric) धोरणामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप आहे. हा अन्याय तातडीने दूर न केल्यास कोकणातील जनतेचा उद्रेक होईल आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा खा. अरविंद सावंत यांनी पत्राद्वारे दिला आहे.
प्रमुख मागण्या:
कोकणवासीयांची गैरसोय आणि वाढती वेटिंग लिस्ट लक्षात घेऊन, मध्य रेल्वेला तातडीने निर्देश द्यावेत. कोकणाकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवून त्या ‘दररोज’ कराव्यात आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेक्स (Rakes/डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या भेटीदरम्यान केली.





