ग्रंथालये अपडेट ठेवा – आम. निलेश राणे

कुडाळमध्ये ग्रंथोत्सव २०२५ चा शुभारंभ

२८ मार्चला होणार ग्रंथोत्सवाची सांगता

ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते नक्की सुटले पाहिजेत. पण ग्रंथालयांनी सुद्धा काळासोबत स्वतःला अपडेट केलं पाहिजे. ग्रंथालय आणि वाचनालय अपडेट झाली पाहिजेत. वाचनालये टिकविण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे आले पाहिजेत. फक्त पगार आणि अनुदान या प्रश्नांपेक्षा ग्रंथालये टिकवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले. कुडाळमध्ये आजपासून सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ ला सुरुवात झाली. त्याच्या उदघाटन प्रसंगी आमदार निलेश राणे बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ आणि २८ मार्चला कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2025 आयोजन कुडाळच्या महालक्ष्मी सभागृहात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज दुपारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले.यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, कुडाळ प स सभापती मिलिंद नाईक, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, रुपेश कानडे, दीपक नारकर, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, टोपीवाला वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट आदी मान्यवर व्यासपीठवर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून मंगेश मसके यांनी जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी आणि ग्रंथालये यांच्या समस्या मांडल्या आणि त्या सोडविण्याची मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडे केली. त्यावर उत्तर देताना आमदार निलेश राणे यांनी सर्व वाचनालये आणि ग्रंथालयांना काळासोबत चालण्याचे आवाहन केले. आपले उदाहरण देत आमदार राणे म्हणाले कि, ते त्यांचे वाचन मोबाईलवर किंवा आयपॅड वर करतात. त्यामुळे ग्रंथालये आणि वाचनालयांनी सुद्धा अपडेट राहिले पाहिजे. ग्रंथोत्सव सारख्या ऊपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. पण हि ग्रंथालये टिकवणे गरजेचे आहे. त्याचे प्रस्ताव संस्था म्हणून तुमच्याकडून आले पाहिजेत आणि शासन म्हणून आम्ही त्यावर काम केले पाहिजे. फक्त दोन दिवशीय ग्रंथ प्रदर्शन आयोजित करून चालणार नाही, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. ग्रंथालयांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याकडे पालकमंत्र्यांकडे दिल्या जातील असेही आमदार निलेश राणे म्हणाले. पुस्तके देऊन आमचे स्वागत केले खरे पण या पुस्तकाचे आमच्याकडून पैसे घ्या आणि पुस्तकांचा मान ठेवा असेही आमदार निलेश राणे यांनी जाता जाता सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी देखील पुस्तके दिशा दाखवतात असे सांगून ज्ञानवर्धक अशा या उपक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी आपल्या मनोगतातून पुस्तके आणि वाचन यांचे महत्व अधोरेखित केले. ग्रंथ हेच आपल्या जीवनाला दिशा देतात असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन पांचाळ यांनी केले. तर आभार ऍड. संतोष सावंत यांनी मानले. यावेळी विविध प्रकाशकांनी पुस्तक प्रदर्शन देखील मांडले होते. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळला. शुभारंभाच्या कार्यक्रमापूर्वी डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुल देवबागच्या बालकलाकारांनी दशावतार नाटक सादर केले. यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. सायंकाळच्या सत्रात कै गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर चर्चा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात हेमंत पाटकर, प्रसाद खडपकर, प्रज्ञा चव्हाण आणि सोनाली गोडे सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर प्रफुल्ल वालावलकर, डॉ. संजीव आकेरकर आणि वर्षा वैद्य यायचं श्रुतीका हा कथाकथनाचा कार्यक्रम झाला. उद्या २८ मार्चला या ग्रंथोत्सवाचे सांगता होणार आहे.

error: Content is protected !!