गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद

सुमारे ३०० शेतकऱ्यांनी घेतला लाभ
तालुक्यात माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह प्रशासनाशी थेट संवाद साधला. शिबिरात शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग पाहून प्रशासनानेही समाधान व्यक्त केले. उपस्थित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले.
या शिबिराची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार संजय गवस, गोठोस सरपंच सुरज कदम, वसोली सरपंच अजित परब, नेरूर क. नारुर सरपंच दिप्ती सावंत, ग्रामपंचायत सदस्य राजा धुरी, गोठोस मंडळ अधिकारी रजनी ढवळ, माणगांव मंडळ अधिकारी श्रीमती कदमयांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत सांगितले की, वाडवडिलांनी कष्टाने जपलेली जमीन फक्त मालमत्ता नाही तर पिढ्यांची ओळख आणि सुरक्षित भविष्य आहे. क्षणिक फायद्यासाठी जमीन विकणे म्हणजे मुळांवर घाव घालण्यासारखे आहे. प्रांताधिकारी काळुसे यांनी शिबिरात महसूल प्रशासनाच्या कामकाजाची माहिती दिली आणि वर्ग २ जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांना अधिक बळकटी मिळेल आणि प्रलंबित न्यायालयीन वादांमध्ये सकारात्मक तोडगा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, प्रलंबित कामे मार्गी लावणे, महसूल यंत्रणेत जनतेचा विश्वास वाढवणे आणि शासनाची ‘आपल्या दारी’ संकल्पना प्रभावीपणे राबवणे हे शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे,असे सांगितले.या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सामायिक जमिनी, खातेफोडी, शहरातील मालकांची संमती मिळवण्यास अडथळा अशा स्थानिक अडचणी मांडल्या. यावर सरपंच अजित परब यांनी मध्यममार्ग शोधण्याची मागणी केली, तर प्रशासनाने त्या अडचणींवर त्वरित लक्ष देण्याचे आश्वासन दिले.





