कणकवलीच्या सांडपाण्यामुळे कलमठची नळपाणी योजना बंद

आशिये गावातील नदीपात्रही झाले दुषित
स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी कलमठ सरपंचांची नगराध्यक्षांकडे धाव
कणकवली शहराचे सांडपाणी थेट गडनदीपात्रात सोडले जात आहे. याच भागात कलमठ गावची नळयोजना आहे. या नळयोजनेतून कणकवलीचे हिरव्या रंगाचे सांडपाणी कलमठवासीयांना दिले जात असल्याने कलमठवासीयांतून तीव्र संताप व्यक्त झाला. त्यामुळे गेले चार दिवस कलमठची नळयोजनाच बंद ठेवावी लागली. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव यांच्यासह कलमठ गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आज थेट कणकवली नगराध्यक्षांच्या दालनात धाव घेतली. कणकवलीच्या सांडपाण्यामुळे कलमठची नळयोजना बंद झालीय. त्यामुळे आता कणकवलीच्या नळयोजनेतूनच कलमठच स्वच्छ पाणी पुरवठा करा अन्यथा कलमठ गावात नागरिकांचा उद्रेक होईल असा इशारा सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला.
कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव, कलमठ उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्यासह कलमठ आणि आशिये गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी आज कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली. यावेळी संदीप मेस्त्री म्हणाले की, कणकवलीच्या नळयोजनेसाठी गडनदी पात्रात बंधारे घालून पाणी अडविण्यात आले. त्यामुळे वागदे, आशिये, कलमठ गावांना नदीतून पाणीच उपलब्ध होत नाही. दुसरीकडे कणकवली शहरातील सांडपाणी अहोरात्र थेट आशिये आणि कलमठ गावच्या हद्दीतून गडनदीपात्रात सोडण्यात आले आहे. सध्या हेच सांडपाणी कलमठ नळपाणी योजनेच्या जॅकवेलमध्ये जाऊन साठले आहे. हे दुषित पाणी कलमठवासीयांना पुरवले तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे आम्ही गेले चार दिवस नळयोजना बंद ठेवली आहे. त्यामुळे कलमठ नाडकर्णी नगर आणि बाजारपेठेतील पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष आहे.
श्री. मेस्त्री म्हणाले की, कणकवली नळयोजनेच्या पाण्याची एक टाकी कलमठ गाव हद्दीत आहे. या पाण्याच्या टाकीतून कलमठ गावाला नळपाणी पुरवठा व्हायला हवा. कारण पाण्याची टाकी बांधताना तसा करार देखील कणकवली आणि कलमठ ग्रामपंचायतींनी केला होता. मात्र या टाकीतून पाणी पुरवठा करताना महिन्याला एक ते दीड लाख रूपयापर्यंतच पाणी पट्टी देण्याची ग्रामपंचायतीची क्षमता आहे. त्यामुळे तातडीने पाणी पुरवठा व्हायला हवा.
आशिये सरपंच महेश गुरव म्हणाले की, कणकवलीतील सांडपाण्यामुळे आशिये गावातील जलस्त्रोत दुषित होत आहेत. तीन महिन्यापूर्वी नगरपंचायत पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून जलशुद्धीकरण यंत्रणा उभारणीची ग्वाही दिली होती. तसेच शोषखड्डे मारून सांडपाणी जमिनीमध्ये मुरविण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत तातडीने उपाययोजना करा, अन्यथा आशिये ग्रामस्थांनाही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे.
सर्व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मानवतेच्या दृष्टीने आम्ही कलमठ ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करू अशी ग्वाही दिली. त्याबाबत एक दोन दिवसांत प्रशासनाशी चर्चा करून तातडीने निर्णय घेतला जाईल. मात्र पाणी पुरवठा करत असताना त्यासाठीचा खर्च मात्र कलमठ ग्रामपंचायतीने द्यावा. कारण कणकवलीची नळयोजना चालविण्यासाठी सुमारे ८० लाखाचा खर्च येतोय. तर दहा लाखाच्या आसपास पाणीपट्टी जमा होतेय. कणकवलीची नळयोजना आधीच तोट्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या प्रमाणात कलमठ ग्रामपंचायतीनेही मोबदला द्यायला हवा असे श्री. पारकर म्हणाले.





