कणकवली नगरपंचायतीची प्लास्टिक बंदीबाबत डोळेझाक

आठवडा बाजारासह सर्वत्र कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याबाबत कडक कारवाई करण्याचा निर्णय नगरपंचायतीने दीड महिन्यापूर्वी घेतला होता. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनीही याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मंगळवारच्या आठवडा बाजारासह सर्वत्र कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा मुक्त वापर होत असल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाने ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. पण कणकवली शहरात १० आणि २० मायक्रॉन पिशव्यांचा वापर मुबलक प्रमाणात होत आहे. आज सकाळी आठवडा भरत असताना शहरातील भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या एजंटांकडून शंभर ते पाचशे पिशव्यांच्या बंडलाचे वितरण झाले. त्यानंतर बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना याच प्लास्टिक पिशव्यांमधून विविध प्रकारची भाजी, फळे, कपडे आणि इतर वस्तूंचे वितरण होत असल्याचे चित्र होते.
प्लास्टिकचा हा खुलेआम वापर होत असताना नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून कुणावरही कारवाई होत नसल्याचे चित्र गेले महिनाभर आहे. कणकवली शहरात सर्वाधिक कचरा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांपासून होते. या पिशव्यांमध्ये भरून घरातील शिळे अन्न आणि इतर पदार्थ बाहेर टाकले जातात. प्लास्टिक पिशव्यांसह आतील पदार्थ जनावरे खातात. यात पाळीव जनावरांचा मृत्यूही होतो. गेल्या दोन महिन्यात प्लास्टिक पिशव्या आणि त्यातील घातक अन्न पदार्थ खाल्याने कणकवली शहरात गायी, म्हशी आणि बैल अशा तब्बल आठ जनावरांचा मृत्यूही झाला होता. या घटनेनंतर नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आदींच्या उपस्थितीत नगरपंचायत प्रशासनाची बैठक झाली होती. या बैठकीत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या बाळगणारे विक्रेते, त्यांचा पुरवठा करणारे एजंट यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले होते. मात्र त्यानंतर कणकवली शहरात सहा वेळा आठवडा बाजार भरला. यात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर झाला. तसेच अजूनही शहरातील सर्वच विक्रेत्यांकडून कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर ग्राहकांना पदार्थ देण्यासाठी होत असून नगरपंचायतीने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.





