अभाअंनिसने केली अंगात येणाऱ्या ‘देवी’ची पोलखोल

एक वेळ संधी देण्याची संबंधिताची याचना
एकीकडे भोंदू अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना कुडाळ तालुक्यातील एका गावात आपल्या अंगात देवी येते सांगून लोकांची आर्थिक लूट करणाऱ्या महिलेची अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितिच्या कार्यकर्त्यांनी पोलखोल केली आहे. त्या महिलेने आपल्यावर कारवाई करू नका मी हे सगळे उद्योग बंद करेन असे लेखी दिले आहे.
याबाबत अनिसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावात गेली दहा ते पंधरा वर्षे एक महिला पटकीदेवी आणि सात बायांची शक्ती आपल्या अंगात येते, असे भासवून कधीही, कोणत्याही वाराला आणि कोणत्याही क्षणी बसल्या बसल्या दुसऱ्या मिनिटाला आपल्या अंगात देवीचा संचार झाल्याचे भासवून पाच हजार ते पन्नास हजार तर कधी कधी एक लाख रुपयापर्यंत पायापासून डोक्यापर्यंत आणि मूळा पासून शेंड्यापर्यंत असलेली नड उतरविण्याचा दावा करीत होती. तिच्या सोबत या असलेल्या नडीची तोड करण्यासाठी एक व्यक्ती नेमण्यात आला होता. सदरच्या व्यक्तीने काही जणांकडून रोख घेतलेल्या रक्कमांचा कागद तिनेच अभाअंनिसला सादर केला. यामध्ये कोणाकडून किती पैसे घेतले हा ढोबळ हिशेब सादर केला. प्रत्यक्षात अजून लाखो रुपयांचा कागदाचा हिशेब मिळू शकेल. अशी लाखो रुपयांची बिदागी श्रद्धाळू आणि अज्ञानी लोकांकडून वसूल केली जात होती.
कोणीही कोणतीही समस्या विचारली तरी विविध कारणे सांगून त्यासाठी ज्याची समस्या आहे त्या प्रत्येकाला पंधरा ते सव्वीस नारळ, एक ते पाच कोंबडे, सव्वा किलो साखर, तीन बाऊले, आंब्याची चाळीस पाने, एकवीस ते तीस वीडे, तेवढीच एक रुपयाची नाणी, साडी चोळी, सात खण , कुजका नारळ, कातर लिंगडीची आणि काजऱ्याची पाने, बीब्बे, सात प्रकारची फूले, सात प्रकारचे धान्य, ब्राह्मण शिदा, कुवाळा ,शंभर खावची पाने, पपई, लिंबे, अंडी, डुकराचे केस, गव्हाचे पीठ, सुके खोबरे, फरसाण, सोन्याची नाणी अशा साहित्यानंतर ते तोडकाम करण्यासाठी तीन हजार ते पुढे लाख भर रूपयापर्यंत पैसे सांगितले जात होते.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी पूर्वी तिच्या घरी जाऊन स्वतःची खरी ओळख आणि आवळेगाव येथे शिक्षक म्हणून काम केले असल्याचे खरे सांगून अंदाजे काय काय लागेल आणि किती खर्च येईल याचा अंदाज विचारून घेऊन विश्वास संपादन केला होता.
त्यानंतर नुकतेच त्यांनी आपल्या सोबत जिल्हा अध्यक्ष ॲड राजिव बिले, सचिव प्रा .अजित कानशिडे, युवा संघटक युगांत चव्हाण, महिला संघटिका उज्वला येळावीकर व त्यांचे यजमान आणि अतुल दळवी यांना घेऊन तीन ते चार समस्या विचारल्या व त्यावर उपायही विचारले. चारही व्यक्तींसाठी वरील प्रमाणे समस्या व लागणारे साहित्य आणि पाच कोंबडे आणि सामान आणले नाही तर वीस हजार खर्च येणार असल्याचे सांगून मूळा पासून शेंड्यापर्यंत मी सगळा बंदोबस्त करून देईन असे त्यांना सांगण्यात आले.
विजय चौकेकर यांनी यावर आपला विश्वास बसत नाही. आपण एखादा चमत्कार अथवा पटेल असे सांगावे. उदा . माझ्या मूलाचे शिक्षण किती आणि आता तो काय काम करतो? आलेल्या व्यक्तिंमधील कोणी एकाला मुले किती व कोणता व्यवसाय करतो ? एवढेही शक्य नसल्यास आम्ही आता बाहेर ज्या गाडीतून आलोय त्या गाडीचा नंबर तरी अंर्तज्ञानाने ओळखून सांगावा असे सांगताच अंगातली ‘देवी’ विसावली. नंतर तिला जादूटोणा विरोधी कायदा काय आहे हे समजून देऊन अभाअंनि समितीचे ऐंशी लाखाचे आवाहन स्विकारावे असेही सांगितले.
मात्र ती असे काहीही करू नका असे सांगून गयावया करू लागली. माझ्या अंगात कोणत्याही देवीचा संचार होत नाही. मला भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यातील कोणत्याही घडलेल्या अथवा घडणाऱ्या घटना ओळखता येत नाहीत. माझ्यात कोणताही दैवी संचार होत नाही. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा माझ्या भल्यासाठी घेत होते. त्यांची आर्थिक फसवणूक करीत होते. माझे वर जादूटोणा विरोधी कायदयानुसार गुन्हा दाखल न करता एक वेळ मला सुधारण्याची संधी द्यावी, पुन्हा मी अंगात कोणतीही देवी आणून लोकांना फसविणार आणि लुबाडणार नाही तसेच घरोघरी जाऊनही लोकांच्या समस्या सोडविणार नाही, असे लेखी लिहून दिले.
यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनेने त्या माफीनाम्यावर सहया करून तिला समजाविले.
आपल्या समस्यांसाठी अशा कोणत्याही भोंदू बाबांच्या आणि अंगात देवी आणण्याचे सोंग करणाऱ्या व्यक्तीच्या अथवा जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबांच्या नादी लागून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. घडणाऱ्या घटनांमागील कार्यकारण भाव जाणून घेऊन चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आचरावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष ॲड राजीव बिले आणि जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले आहे.





