कणकवली कृषी महोत्सव, शेतकरी मेळाव्यात कृषी विभागाला सभापती, उपसभापती यांचा विसर

कृषी विभागाकडून परस्पर आयोजन

काही सदस्यांकडून कृषी विभागाच्या “मॅनेज” कार्यपद्धती बाबत तीव्र नाराजी

कणकवली तालुकास्तरीय कृषी महोत्सव व शेतकरी मेळावा कणकवली कॉलेज च्या ठिकाणी 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. परंतु हा मेळावा आयोजित करत असताना तालुका कृषी विभागाला पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्यांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. कारण कृषी विभागाने या मेळाव्याचे आयोजन करत असताना पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यापासून अनभिज्ञ ठेवतच मेळाव्याचे आयोजन केल्याची बाब समोर आली आहे. त्यातच पंचायत समिती सदस्यांना देखील या मेळाव्या बाबत कल्पना दिलेली नाही. त्यामुळे काही सदस्यांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या या मुजोर कार्यपद्धती बाबत लोकप्रतिनिधींमधून नाराजी व्यक्त केली गेली आहे. कणकवली तालुकास्तरीय कृषी महोत्सव व शेतकरी मेळावा आयोजित करत असताना तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेवर पदाधिकाऱ्यांची नावे टाकण्याचा विसरच तालुका कृषी विभागाला पडल्याचे दिसून आले. दरम्यान हा महोत्सव पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून घेतला जात असल्याने निधी खर्च करण्याकरिता हा महोत्सव होता का? असा देखील सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. कृषी विभागातील काही वर्षानुवर्षे “मॅनेज सिस्टीम” मध्ये काम करणाऱ्यांकडून हा सारा नियोजनाचा प्रकार केला गेल्याचे समजते. परंतु या प्रकाराबाबत काही पंचायत समिती सदस्यांनी थेट अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केल्याने तालुका कृषी विभागाच्या “या” अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. तालुका कृषी विभागामधील या मॅनेज सिस्टीम मध्ये काम करणाऱ्यांना याची समज दिली जाणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. कृषी मार्गदर्शन व शासकीय योजना, प्रदर्शन व थेट विक्री केंद्र, शेतकरी सन्मान व संमेलन या सह अनेक अन्य मुद्द्यांच्या अनुषंगाने हे महोत्सव व मेळावा आयोजित केला गेला आहे. मात्र एवढ्या मोठ्या व्यापक स्वरूपातील असलेल्या या महोत्सवाला पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवणे कितपत योग्य असा देखील सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या विशेष संकल्पनेतून या महोत्सव व मेळाव्याचे आयोजन केले जात असताना कृषी विभागाला तालुक्याच्या महिला सभापतींचा जर विसर पडला तर तालुका कृषी विभाग यातून नेमके काय साध्य करू पाहत आहे? असा देखील सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

error: Content is protected !!