‘व्वा वुमनिया’ तील महिलांचे बहारदार कलाविष्कार लक्षवेधी

महापुरुष मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत
शहरातील श्री देव महापुरुष मंदिरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महापुरुष महाउत्सवात शनिवारी रात्री ‘व्वा वुमनिया’ हा महिलांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. महापुरुष मित्रमंडळच्या महिलांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या भावपूर्ण गणेश वंदनेने झाली. त्यानंतर महिलांनी सादर केलेले गोंधळ नृत्य आणि कोळी नृत्य प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. ‘आकाश गंगा’ या गाण्यावर लहान मुलींनी सादर केलेला नृत्याविष्कार उत्स्फूर्त दाद मिळवून गेला. पायल डिचोलकर हिने ‘ललाटी भंडारी’ हे प्रभावी नृत्य सादर करत रंगमंच गाजवला.
दहा महिलांच्या गटाने पारंपरिक वेशभूषेतील फॅशन शोच्या पहिल्या फेरीत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले. महाभारतातील कथानकावर आधारित ‘वस्त्रहरण’ नाट्यप्रयोगाने सामाजिक आशय अधोरेखित केला. साऊथ इंडियन रिमिक्स गाण्यांवर मुलींचे सादरीकरण तसेच ‘बॉलिवुड मिक्स किड्स’ वरील लहानग्यांचा डान्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
‘मंगळागौर’, ‘बाईपण भारी’ यांसारख्या मराठी गाण्यांवर महिलांनी सादर केलेले नृत्य, तसेच विद्या शिरसाट हिने सादर केलेले एकपात्री अभिनय यांना भरघोस दाद मिळाली. ‘मितवा’, ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यांवरील नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली.
आर्या सावंत हिने सादर केलेला शास्त्रीय नृत्याविष्कार, ‘आले मराठे’ या गाण्यावरचा जोशपूर्ण डान्स, तसेच रेट्रो गाण्यांवरील महिलांचा ठेका आणि ‘घूमर’ वरील सादरीकरण विशेष ठरले. भूमी काणेकर हिने मराठी गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने दाद मिळवली, तर भूमी आणि तिच्या सहकाऱ्यांनी मराठी रिमिक्सवर रंगतदार सादरीकरण करत कार्यक्रमाची सांगता उत्साहात केली.
‘व्वा वुमनिया’ या कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





