मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा घाडीगांवकर समाजाने केला सन्मान

उपमहापौर घाडी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई यासंस्थेच्या सर्व विभागातील पदाधिकारी/ कार्यकारी सदस्य यांचे एक शिष्टमंडळ यांनी बुधवारी मुंबईचे उपमहापौर संजय शंकर घाडी (मूळगांव पडेल, देवगड )यांची बृहन्मुंबई महानगर पालिकेत त्यांच्या दालनांत भेट घेतली. उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गांवकर यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यांत आला.
१९ नोंव्हेंबर १९५६ रोजी घाडीगांवकर समाज बांधव हुतात्मा सिताराम दुलाजी घाडीगांवकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपले बलिदान दिले.त्यानंतर आज ७० वर्षांनी त्याच मुंबई शहरांत क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाजातील एक कर्तृत्ववान, अभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व संजय शंकर घाडी हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यशस्वी झाले. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या मानाच्या आणि जबाबदारीच्या पदावर विराजमान झाले.
उपमहापौर म्हणजेच मुंबई शहराचे द्वितीय नागरिक होण्याचा मान समाजातील व्यक्तीस मिळणे ही बाब केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी गौरव, प्रेरणा आणि अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या पिढीसाठी हा क्षण आदर्श ठरणारा आहे.
उपमहापौर संजय घाडी यांच्या पुढील सार्वजनिक, सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी घाडीगांवकर समाजाच्या शिष्टमंडळातर्फे देण्यात आल्या. तसेच त्यांचे कार्य समाजहिताचे, शहरविकासाचे व जनतेच्या कल्याणाचे दीपस्तंभ ठरो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
यावेळी समाज संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, सचिव गजानन घाडीगांवकर, जयप्रकाश घाडीगांवकर, नारायण घाडीगांवकर,सुहास गांवकर ,विनय घाडी, सुनिल घाडीगांवकर ,रामचंद्र घाडी , सतीश घाडी, कृष्णा घाडी, नामदेव घाडी आदी पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!