गेल्या 15 दिवसात कणकवली शहरात तब्बल 11 मोकाट गुरांचा मृत्यू

सातत्याने गुरांचा मृत्यू विषबाधा की विष प्रयोग?

मोकाट गुरांच्या बाबतीत नगरपंचायत प्रशासन लक्ष कधी देणार?

यापूर्वी गुरांच्या मालकांचा शोध घेत केली होती दंडात्मक कारवाई

कणकवली शहरात सातत्याने मोकाट गुरांचा मृत्यू होण्याची घटना सातत्याने सुरू असून गेल्या पंधरा दिवसात ही तिसरी घटना आज रविवारी उघडकीस आली. आज रविवारी मृत्यूमुखी पडलेल्या गुरांमध्ये दोन म्हशी व एक रेडा अशा तिघांचा समावेश आहे. कणकवली टेंबवाडी परिसरातच ही गुरे मृत्यूमुखी पडत असल्याने या ठिकाणी असलेल्या भातगिरणीची भाताची करले खाण्यासाठी गेलेल्या या म्हशींचा मृत्यू झाला असल्याचे समोर झाले असले तरी या म्हशींच्या आसपासच्या भागात काही उग्र वास येणाऱ्या पुड्या देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही विषबाधा असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी सातत्याने गेले काही दिवस शहरातील गुरांचा मृत्यू होणे ही बाब म्हणजे हा विषप्रयोग तर नाही ना? अशी देखील चर्चा आता कणकवली शहरात सुरू झाली आहे. गेल्या 15 दिवसात झालेल्या एकूण 11 गुरांच्या मृत्यू मागे नेमकी कारणे काय त्याची चौकशी होण्याची गरज आहे. अशी देखील मागणी होत आहे. यापूर्वी देखील कणकवली टेंबवाडी परिसरात 6 गुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवसांनी 2 गुरे भालचंद्र महाराज आश्रम शेजारील मोकळ्या जागेत मृतावस्थेत सापडली होती. त्यानंतर आज पुन्हा 3 मोकाट गुरे मृत्यूमुखी पडल्याने एकूणच या गुरांच्या मृत्यूमुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. कलमठ बिड्येवाडी येथील नारायण पुजारी यांच्या मालकीच्या या 2 म्हशी व 1 रेडा होता. या गुरांच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान यापूर्वी टेंबवाडी मध्ये एकाच वेळी 6 गुरांच्या मृत्यू चे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये विषबाधा हे कारण दाखवण्यात आले होते. परंतु मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे हा विषप्रयोग तर झालेला नाही ना? अशी देतील शंका कणकवली शहरातील नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे. त्यातच कणकवली शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न देखील या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरनीवर आला असून मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घेत त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे. दरम्यान ही माहिती मिळताच कणकवलीचे नगरसेवक बंडू हर्णे , येथील सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी घटनास्थळी भेट देत नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले.

error: Content is protected !!