घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी; प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’

आमदार निलेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित घोडगे-सोनवडे घाटमार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. या मंजुरीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पाला यापूर्वीच पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
याबाबत बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, “आज अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देताना मनाला फार समाधान वाटत आहे. घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पर्यावरणीय मंजुरी अगोदरच मिळालेली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक असलेली अंतिम परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.”
या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले. तसेच प्रकल्पासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि संबंधितांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
घोडगे-सोनवडे घाटमार्गामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, या मार्गामुळे दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क वाढण्याबरोबरच परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
“हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलली जातील. सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!