न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे ‘बरसती श्रावण सरी’नी रसिक मंत्र मुग्ध

न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या विद्यार्थ्यांनी गीत आणि संगीताच्या जोडीने सादर केलेल्या श्रावण कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्रावण महिन्याच्या आगमनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे ‘बरसती श्रावण सरी’ – गीत, कविता आणि निसर्ग भावनांचा मनोहारी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. श्रावणाच्या रिमझिम सरी, हिरवाईने नटलेला निसर्ग, दाटून येणारे मेघ आणि मराठी साहित्य गीतांमधून उमटणाऱ्या निसर्ग भावना यांचा सुंदर सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय प्रथमेशा गणेशा’ या मंगलमय गीताने झाली. हे गीत श्री राजन सर यांनी सादर करून कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली.
त्यानंतर कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेले ‘हसरा नाचरा जरासा लाजरा , सुंदर साजिरा श्रावण आला’ हे गीत कृतिका आयर हिने भावपूर्ण स्वरात सादर केले. त्यानंतर विद्याधर गोखले लिखित ‘ऋतुराज आज वनी आला’ हे सुंदर गीत स्वरा रेडकर हिने सादर करून रसिकांची दाद मिळवली. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या लेखणीतून साकारलेले ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे लोकप्रिय गीत स्वरा आचरेकर हिने अप्रतिम आवाजात सादर केले .तिच्या भावपूर्ण गायनाने वातावरण अक्षरश: श्रावणमय झाले. त्यानंतर आरती प्रभू यांच्या लेखणीतून साकारलेले ‘ये रे घना येरे घना’ हे अजरामर गीत भार्गवी महाभोज हिने सुंदर पद्धतीने सादर केले. महाकवी ग.दी.माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेले ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ हे भावस्पर्शी गीत माननीय श्री. कमलाकर पाटकर यांनी आपल्या दमदार आणि सुरेल आवाजात सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली .
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रशालेतील शिक्षिका व कवयित्री सौ. मधुरा माणगांवकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या सुंदर लेणे, धून श्रावणी, माहेर, नभात श्रावण मनात श्रावण- श्रावण मासी होऊया. या कवितांनी कार्यक्रमाला साहित्यिक सौंदर्याची वेगळी उंची प्राप्त करून दिली तसेच शिक्षिका सौ. अनघा कदम यांनी लिहिलेली ‘सुरू झाला सृजन सोहळा’ आणि शिक्षक सद्गुरु साटेलकर लिखित ‘श्रावणाची नवलाई’ ही कविता देखील रसिकांसमोर सादर करण्यात आली. या सुंदर कवितांचे सादरीकरण किंजल परब, नुर्वी शेडगे, एंजल फर्नांडिस, खुशी सावंत, सिया खोत आणि यज्ञवी धुळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. विद्यार्थिनींच्या भावपूर्ण काव्यवाचनातून श्रावणातील निसर्ग, हिरवाई, पाऊस, माहेर आणि मराठी संस्कृतीचे विविध पैलू उपस्थितांसमोर जिवंत झाले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन शिक्षक सद्गुरु साटेलकर यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाला संगीताची सुंदर साथ हार्मोनियम माननीय श्री. अनिरुद्ध आचरेकर आणि तबल्याची साथ माननीय श्री. कमलाकर पाटकर यांनी केली .त्यांच्या सुरेल व तालबद्ध साथीमुळे गीतकवितांच्या सादरीकरणाला अधिक रंगत आली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य अर्जुन बापर्डेकर यांची विशेष उपस्थिती लाभली ,तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्रावणातील या मधुर गीत, कवितांचा आणि निसर्ग भावनांचा मनमुराद आनंद लुटला .






