संविता आश्रमच्या प्रांगणात के.जे. सोमैया कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात संपन्न

आश्रमातील बांधव व कार्यकर्त्यांसोबत विद्यार्थ्यांनी जपले भातृभावाचे नाते

सोमैया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राबविली पणदूरच्या स्मशानात स्वच्छता मोहीम.

मुंबई विद्याविहार येथील के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे आठभं दिवसीय निवासी शिबीर जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत नुकतेच संपन्न झाले.

शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी आश्रमातील सेवा कार्यात सक्रिय सहभाग घेतला. अंथरुणावर खिळलेल्या बांधवांना जेवण भरविणे, त्यांच्याशी संवाद साधणे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता वाढीस लागली. या वास्तव्यात विद्यार्थ्यांचे आश्रमातील बांधव व कार्यकर्त्यांशी आपुलकीचे आणि भातृभावाचे नाते निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

शिबिरादरम्यान अणाव गावातील भापगिरी डोंगरावरील वृक्षांना पाणी घालणे, पणदूर तिठा परिसर व स्मशानभूमी स्वच्छता, ग्रामपंचायत भेट व ग्रामस्थांशी संवाद, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा फुगडी कार्यक्रम, तसेच शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांचे हस्ते झाले. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे, जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब, मानसोपचारतज्ज्ञ रुपेश पाटकर यांची प्रेरणादायी व्याख्याने असे विविध उपक्रम राबविण्यात आले….ग्रामपंचायत सदस्य गौरी साईल, टंगसाळी मॅडम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पथनाट्य, सोलो व समूह गायन, समूह नृत्ये, वादविवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आदींनी भरगच्च होता शिबिराचा एकूण कार्यक्रम.

मुंबई विद्यापीठांतर्गत एनएसएसचे हे शिबीर मुंबईपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूरसारख्या ग्रामीण भागात यशस्वीपणे पार पडले. दरवर्षी मुंबईजवळील डहाणू येथे होणारे शिबीर यंदा दूरवरच्या गावात ५० विद्यार्थ्यांसह आयोजित करण्यात आले, हे या शिबिराचे वेगळेपण ठरले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य किशन पवार सर यांनी दाखविलेला विश्वास, तसेच एनएसएस समन्वयक प्रा. अमोल भोसले, प्रा. दिपाली तोरसकर, सुनीता गवई , श्रुती उजगावकर , निकीता शेवाळे, गणेश नडाले, व कांचन मांडवकर यांनी गेल्या चार महिन्यांपासून केलेले काटेकोर नियोजन मोलाचे ठरले. शिबिरामध्ये समृद्धी संतोष खांबे यांची उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून तर आरती बाउरी यांची उत्कृष्ट कॅम्प लीडर म्हणून निवड झाली.

शिबिराच्या यशात जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांचा सक्रिय पाठिंबा, आश्रमात केलेली जय्यत तयारी, संस्थेचे विश्वस्त किसन चौरे, समन्वयक कार्यकर्ते छंशैलेन्द्र कदम आणि रामचंद्र राणे यांनी केलेला पाठपुरावा, आश्रमातील सेवा कार्यकर्ते व बांधवांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. के जे सोमैया महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व संविता आश्रमच्या टीमच्या एकत्रित प्रयत्नांतून हे शिबीर सर्व दृष्टीने यशस्वी व संस्मरणीय ठरले.

error: Content is protected !!