वागदे मधील चोरी प्रकरणी श्रीकृष्ण उर्फ आर्यन ठाकूरला पोलीस कोठडी

पाळत ठेवून केली घरातली दागिन्यांची चोरी
हळवल मधील चोरटा कणकवली रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
वागदे-नमसवाडी येथे १७ जानेवारीला झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. पोलिसांनी श्रीकृष्ण उर्फ आर्यन नीलेश ठाकुर (१९, रा. हळवल-भाकरवाडी) याला कणकवली रेल्वेस्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चोरी केलेले दागिने त्याने एका फायनान्स बँकेत गहाण ठेवत्याचे तपासात समोर आले आहे.
अंकिता घाडीगावकर या १७ जानेवारी रोजी सकाळी कामावर गेल्या होत्या, नेहमीप्रमाणे त्यांनी घराची चावी आणि कपाटायी चावी घरातील पिशवीत लपवून ठेवली होती. ही संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि कपाटातील ६२ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. सायंकाळी घरी परतल्यावर अंकिता यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीकृष्ण ठाकुर याचे नाव समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता श्रीकृष्ण याने चोरी केलेल्या दागिन्यातील दोन कुडी, एक डौली आणि अंगठी हे कणकवली येथील मुथूट फायनान्स बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले असल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे आणि किरण देसाई यांच्या पथकाने केली.





