वेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !

अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने वारंवार वाहतूक कोंडी, थांबा अन्यत्र हलविण्याची आरटीओंची सूचना

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. हा थांबा अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आरटीओंनी हा थांबा अन्यत्र हलवावा, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्याप एसटी प्रशासन आणि हायवे प्राधिकरण यांनी त्याबाबत निर्णय घेतला नसल्याने हा थांबा वाहनधारक तसेच रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे.
अंडरपासच्या ठिकाणीच बसेस प्रवासी घेण्यास आणि उतरविण्यास थांबविल्या जात असल्याने इतर बाजूने येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. अशातच अंडरपास खाली बेकायदा खाजगी वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. कुडाळ-कणकवली दरम्यान जाणाऱ्या एसटी बसेस सध्या अंडरपासच्या समोर थांबविल्या जातात. पूर्वी जेथे थांबा होता तिथे महामार्ग प्राधिकरणाने थांबा करून द्यावा आणि वाहतूक कोंडीला जो थांबा कारणीभूत ठरत आहे तो बंद करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कुडाळ-ओरोस-कणकवली जाणाऱ्या एसटी बसेसना सर्विस रोडवर अधिकृत थांबा देण्यात आलेला नाही. बसचालक अंडरपाससमोरच बस थांबवितात. त्यामुळे आता प्रवासी तिथे थांबू लागले आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. या बसेस अंडरपाससमोर थांबतात. त्यावेळी कुडाळ येथून हिर्लोक, नारुर परिसरात जाणाऱ्या बसेस आल्यास त्या बसेसच्या मागे थांबतात. त्याचवेळी ओरोस-कणकवलीच्या दिशेने येणारी वाहने सर्विस रोड आणि अंडरपासच्या खाली अडकतात. बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एसटी बसेसना थांबा हा अंडरपास समोर न देता मागे किंवा पुढे द्यावा अन्यथा पूर्वीच्या जागी द्यावा अशी मागणी होत आहे.
वेताळ बांबर्डे येथील रहिवासी रामकृष्ण शशिकांत सामंत यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन अंडरपास खाली एसटी बसेसना थांबा नसल्याने अंडरपाससमोर अनधिकृत थांबवण्यात येतात. महामार्ग क्रमांक १७ असताना पूर्वीचा बसथांबा हा सध्याच्या बॉक्सच्या पुढे कणकवलीच्या दिशेने ३० ते ३५ मीटरवर होता. बसथांबा हायवेसाठी आरक्षित केलेल्या जागेत पूर्वीच्या ठिकाणी करावा तिथेच प्रवासी शेड हायवेच्या आरक्षित जागेत बांधावी अशी मागणी करीत वस्तुस्थितीची पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!