इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ची “आरंभ” सभा १७ जानेवारीला कुडाळमध्ये

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस (IIA) रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्राची सिंधुदुर्गमधील पहिली सभा “आरंभ ” कुडाळमध्ये वासुदेवानंद हॉल येथे १७ जानेवारीला सकाळी १० ते दुपारी २ या वेळात आयोजित केली आहे. अशी माहिती आयआयए रत्नागिरी- सिंधुदुर्ग केंद्रातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या केंद्राचे उद्घाटन नुकतेच नोव्हेंबर २२, २०२५ रोजी रत्नागिरी येथे झाले आहे.
या कार्यक्रमास आयआयए महाराष्ट्र चॅप्टर चेअरमन आर्कि. संदीप प्रभू, आयआयए महाराष्ट्र चॅप्टर जॉइंट सेक्रेटरी आर्कि. उपेंद्र पंडित, आयआयए रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्राचे मानद मार्गदर्शक आर्कि. संतोष तावडे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्राचे पदाधिकारी, सभासद व रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वास्तुविशारद, सरकारी अधिकारी, इंजिनिअर, बांधकाम क्षेत्रातील माननीय सदस्य व इतर निगडित क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
भारतीय वास्तुविशारद संस्था म्हणजेच आयआयए हि संस्था १०८ वर्षांचा इतिहास लाभलेली राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्ट्स आणि सीओए नोंदणीकृत ३० हजारांहून अधिक वास्तुविशारदची संस्था आहे. सीओए नोंदणीकृत व्यावसायिकांचे परस्पर हितसंबंध जोपासणे तसेच या क्षेत्रातील शैक्षणिक व्यावसायिक दर्जा उंचावणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच विविध प्रकाशने, व्याख्याने, कार्यशाळा आदी विविध उपक्रम या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य भारतीय वास्तुविशारद रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्र करणार आहे. शहर विकास, नियमावली, विविध बांधकाम योजना,पायाभूत सुविधा या दृष्टीनेही शासनाशी वेळोवेळी समन्वय साधून कोकणच्या विकासाच्या दृष्टीनेही हि संस्था कार्यरत राहणार आहे. या संस्थेचे केंद्र कोकणसाठी सुरू होत असून अशाप्रकारची संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणे आवश्यक होते. हे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याने अनेक व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. अनेक मान्यवर व्यक्ति, शासनाचे लोकप्रतिनिधी यांचेकडून आयआयए संस्थेच्या केंद्राचे स्वागत करण्यात येत आहे.
स्थापत्य कलेची सौंदर्यदृष्टी, शास्त्रीयता आणि कार्यक्षमता वाढवणे तसेच शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात दर्जा उंचावण्यासाठी हि संस्था उपक्रम राबविणार आहे. कोकणातील वास्तू व निसर्ग या विषयांशी निगडित असलेले २ व्याख्यान आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये CIDCO चे माजी मुख्य आर्किटेक्ट दिनकर सामंत व KONBAC या संस्थेचे श्री. संजीव कर्पे हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कोकणच्या विकासासाठी या केंद्राचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे.स्थापत्य कलेचा अभ्यास, व्यावसायातील मानके उंचावणे परस्पर सहकार्याद्वारे सर्व भारतीय स्थापत्यकारांचे हितसंबंध जपणे असे संस्थेचे उद्देश आहेत. आयआयए रत्नागिरी- सिंधुदुर्ग केंद्राच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





