भंगसाळ बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात

आई-मुलाला ग्रामस्थांनी वाचविले
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील आई आणि मुलगा नदीपात्रात पडले. मात्र, शेलटेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत दोघांनाही पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. या घटनेत दोघांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंगसाळ बंधाऱ्यावरून जात असताना दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली. यावेळी दुचाकीवरील मुलगा आणि त्याची आईही पाण्यात पडले. घटना लक्षात येताच शेलटेवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले.
या अपघातात जखमी झालेल्या आई-मुलाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात कोसळलेली दुचाकीही बाहेर काढण्यात आली. ग्रामस्थांनी वेळीच मदत केल्याने दोघांना वाचविण्यात यश आले.






