‘गार्गी आणि इतर एकांकिका’ला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार

लेखक उदय जाधव यांच्या लेखनाचा सन्मान
मूळ कोकणचे सुपुत्र आणि सध्या मुंबईत नाट्यदिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले नाटककार जयंत पवार नाट्य पुरस्कार विजेते लेखक उदय गणपत जाधव यांना आणखी एका मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री संत किसन महाराज सुडके आश्रमातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कारासाठी त्यांच्या ‘गार्गी आणि इतर एकांकिका’ या संग्रहाची निवड झाली आहे.
महाराष्ट्रभरातून प्राप्त झालेल्या असंख्य साहित्यकृतींचे पारदर्शक पद्धतीने परीक्षण करून निवड समितीने पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये नाट्यवाङ्मय विभागात ‘गार्गी आणि इतर एकांकिका’ या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक बुक स्टार प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
लेखक उदय जाधव यांनी आतापर्यंत अनेक नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन केले असून रंगभूमीवर त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचे ‘देवन प्रिय अशोक’ हे नाटक विशेष गाजले असून बहुचर्चित ठरले आहे.या पुरस्कारामुळे उदय जाधव यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यस्तरावर त्यांच्या लेखनाची पुन्हा एकदा दखल घेतली गेल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.






