कुडाळेश्वर मंदिरात आजपासून कीर्तन महोत्सव

सहा कीर्तनकारांच्या भक्तिसेवेने रंगणार कीर्तन महोत्सव
२५ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेचा विशेष सोहळा
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर ते रविवार, २५ ऑक्टोबर या कालावधीत विविध नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेने हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात भाविकांना आध्यात्मिक आणि भक्तिमय पर्वणी अनुभवता येणार आहे.
महोत्सवाचा प्रारंभ मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता पुणे येथील ह.भ.प. किसतबुवा कुलकर्णी यांच्या ‘महामुनी अष्टावक्र’ या कीर्तनाने होणार आहे. बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. कैलास बुवा खरे, डोंबिवली यांचे ‘राका कुंभार’ हे कीर्तन सादर होईल.
गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी पुणे येथील ह.भ.प. ज्ञानेश महाराज जोशी-धानोरकर ‘हनुमंत-आनंदभक्ती’ हा कीर्तनविषय सादर करतील. शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी मालवण येथील ह.भ.प. हरिहर बुवा नातू यांचे ‘शंखिनी कथानक’ हे कीर्तन होणार आहे.
शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी भिवंडी येथील ह.भ.प. अभय घांग्रेकर यांचे ‘दूधभात भिक्षा’ हे कीर्तन रंगणार आहे. रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी पनवेल येथील ह.भ.प. सौ. वर्षा रानडे-सहस्त्रबुद्धे यांच्या ‘पार्वती स्वयंवर’ या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. सर्व कीर्तने रात्री ८.३० वाजता सुरू होतील.
या कीर्तन महोत्सवामध्ये ऑर्गन – बाळकृष्ण उर्फ पप्पू नाईक, तबला – सिद्धेश कुंटे, पखवाज – आनंद मोर्ये, बासुरी – किरण वर्दम यांची संगीतसाथ आहे.
या संपूर्ण किर्तन महोत्सवाचे प्रायोजक विजय प्रभू,पिंगुळी तर कुडाळ येथील सावंत प्रभावळकर कुटुंबीय, गजानन कांदळगावकर, डॉ. योगेश नवांगुळ, विलास राणे, सदासेन सावंत आणि विनय वर्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता ऍड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय ५१ व्या भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्रीमंत नारायण महाराज पूजा, दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता भजनस्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ, तर रात्री ८.३० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार मंडळ, दांडेली-आरोस यांचे ‘द्विय रक्तमणी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
याशिवाय, कीर्तन सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आमंत्रित सनई-चौघडा वादनाचा कार्यक्रम होणार आहे. कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून भाविकांना भक्तिरसाचा आनंद घेता यावा, यासाठी मंडळाच्या वतीने सर्व मित्रमंडळी, भाविक आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री देव कुडाळेश्वर देवतेची समाराधना असून, त्यानिमित्त दुपारी १२.३० वाजता महाप्रसादासाठी उपस्थित राहावे, असेही मंडळाने कळविले आहे.






