‘कुडाळेश्वर’ च्या भजन स्पर्धेत पिंगुळीचे रवळनाथ भजन मंडळ प्रथम

उत्कृष्ट गायकाचा मान प्रसाद शेवडे यांना
२५ ऑक्टोबरला बक्षीस वितरण सोहळा
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने आयोजित ऍड. अभय देसाई स्मृती ५१ व्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत पिंगुळी येथील श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. देवगड-जामसंडे येथील स्वरब्रह्म भजन मंडळाने द्वितीय, तर पाट-पंचक्रोशी येथील रामकृष्ण हरी भजन सेवा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. येत्या २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता भजनस्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.
श्री देव कुडाळेश्वर मंदिर मध्ये संपन्न झालेल्या श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने आयोजित ऍड. अभय देसाई स्मृती ५१ व्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत जिल्हाभरातून २३ भजन मंडळे सहभागी झाली होती. पहिल्या तीन क्रमांकाव्यतिरिक्त या स्पर्धेत घोडगे येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाला चतुर्थ, तर कोचरा येथील भूतनाथ प्रासादिक भजन मंडळाला पाचवा क्रमांक मिळाला.
स्पर्धेतील उत्कृष्ट गायकाचा पुरस्कार देवगड-जामसंडे येथील स्वरब्रह्म भजन मंडळाचे प्रसाद शेवडे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून वालावल येथील जैन-महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळाचे यश सावंत, तर उत्कृष्ट तबलावादक म्हणून केरवडे येथील श्री जगन्नाथ प्रासादिक भजन मंडळाचे प्रणव परब यांची निवड झाली आहे. उत्कृष्ट हार्मोनियम वादक ठरले आहेत, राठीवडे येथील विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळाचे अक्षय परुळेकर, तर उत्कृष्ट झांजवादक ठरले आहेत, घोडगे येथील श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाचे चंदन ढवळे. दरम्यान, पावशी येथील योगेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळाला लक्षवेधी भजन संघ म्हणून गौरविण्यात आले आहे.
भजन स्पर्धचे परीक्षण योगेश प्रभू आणि मोहन मेस्त्री यांनी केले. या भजन स्पर्धेत विविध २३ भजन मंडळांनी सहभाग घेत आपली कला सादर केली. स्पर्धेच्या माध्यमातून भजन परंपरेला प्रोत्साहन मिळण्यासोबतच भजन कलाकारांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध झाले.






