कलमठ पिंपळपार येथे उच्चदाब विद्युत वाहिन्यांचा जीवघेणा धोका – महावितरणचा निष्काळजी पणा

प्रांताधिकाऱ्यांकडे ठोस कार्यवाहीची मागणी
ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा दिला इशारा
कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील ग्रामपंचायत सभामंडपाच्या थेट छतावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्या आजही तशाच धोकादायक अवस्थेत असून, शेकडो ग्रामस्थांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर बाबीकडे महावितरण व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी केला आहे. दररोज १०० ते १५० नागरिक, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक या सभामंडपात ये-जा करतात. मात्र, त्या सभामंडपावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनीच लेखी पत्राद्वारे येथे जीवितहानी व वित्तहानीची दाट शक्यता असल्याचे मान्य केले असतानाही, प्रत्यक्षात केवळ प्लास्टिकचे तकलादू आवरण लावून कर्तव्यपूर्ती केल्याचा दिखावा करण्यात आला आहे. ही तथाकथित उपाययोजना म्हणजे नियमांची थट्टा असून नागरिकांच्या जीवाशी केलेली उघड फसवणूक असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री व ग्रामस्थांनी कणकवली प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
भारतीय विद्युत कायदा २००३ व केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असताना, त्याच नियमांना हरताळ फासून ही धोकादायक स्थिती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शासन यंत्रणेतील दुटप्पीपणा उघड झाल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.
या प्रकरणात तात्काळ व कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व महावितरणवर राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, २० जानेवारी २०२६ पर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी याच धोकादायक विद्युत वाहिन्यांच्या शेडखाली उपोषण छेडण्याचा निर्णय ग्रामपंचायत सदस्य श्री. धीरज श्रीधर मेस्त्री यांनी जाहीर केला आहे.
“दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा, आत्ताच कारवाई करा!”
“नागरिकांचे प्राण महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वेठीस धरले जाणार नाहीत!”अशी मागणी श्री. मेस्त्री यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.





