भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा 4 जानेवारीपासून

भालचंद्र महाराज यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर जन्मोत्सव सोहळ्याची मोठी पर्वणी
दीपोत्सव स्पर्धेच्या नावाखाली पैसे गोळा करण्याच्या प्रकाराला संस्थानाचा विरोध
संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत यांची माहिती
योगीयांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्मोत्सव सोहळा रविवार 4 जानेवारी ते गुरुवार 8 जानेवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. 8 जानेवारी रोजी भालचंद्र महाराज जन्म झाला असून यावेळी त्याच कालावधीत जन्मोत्सव सोहळा होत आहे ही एक मोठी पर्वणी आहे. अशी माहिती भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली. भालचंद्र महाराज संस्थान कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सचिव निवृत्ती धडाम, दादा नार्वेकर, गजानन उपरकर, मुरलीधर नाईक, नागेश मुसळे, व्यवस्थापक विजय केळुसकर आदी उपस्थित होते. रविवार 4 जानेवारी ते बुधवार 7 जानेवारी या कालावधीत पहाटे 5.30 ते 8 वा. काकड आरती, समाधी पूजा, अभिषेक, सकाळी 8 ते 12.30 वा. सर्व भक्तांच्या कल्याणार्थ परमहंस भालचंद्र महारुद्र स्वहाकार विधी, दुपारी 12.30 ते 3 वा. आरती व महाप्रसाद दुपारी 1 ते 4 भजने, सायं. 4 ते 8 वा. सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर आरती होणार आहे. रविवार 4 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते 12.30 वा. या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. बुधवार 7 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 वा. या वेळेत 122 रक्तदात्यांचे रक्तदान होणार आहे. गुरुवार 8 जानेवारी हा परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्मदिन आहे. यानिमित्त पहाटे 5.30 ते 8 काकड आरती, समाधी पूजा, जपानुष्ठान, सकाळी 8 ते 9 वा. भजने, सकाळी 9 ते 11.30 समाधी स्थानी लघुरुद्र, सकाळी 9.30 ते 12 वा. जन्मोत्सव कीर्तन (ह. भ. प. श्री. भाऊ नाईक, रा. वेतोरे) दुपारी 12 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्म सोहळा, दुपारी 12.30 ते 3 आरती व महाप्रसाद, सायं. 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, तसेच वारकरी मंडळींच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक नंतर आरती होणार आहे. तर रात्री 12 वा. नंतर कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत ट्रिकसीनयुक्त ‘गज वज्रकाय संगम’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे. रविवार 4 जानेवारी रोजी सायं. 4 ते 7 वा. या वेळेत जि. प. शाळा कुणकेश्वर, कातवण यांचा 14 गीतांवर मुलांचा चित्तवेधक समई नृत्याविष्कार, सोमवार 5 जाने. रोजी दु. 3.30 ते 7.30 वा. शाळा नं. 3 कणकवली प्रस्तुत मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम. मंगळवार 6 जाने. रोजी सायं. 5 ते 7.45 वा. या वेळेत मनोज मेस्त्री यांची शास्त्रोक्त गायन व भावगीत-अभंग- नाट्यपदांची मैफिल गुरुवंदना. बुधवार 7 जाने. रोजी सायं. 4.30 ते 7.45 वा. या वेळेत एम. आर. शांताराम आय वेअर कणकवली प्रस्तुत भक्तीगीत, नाट्यगीत, लोकगीतांचा सुमधूर संगीत संध्या कार्यक्रम होणार आहेत. तसेच दीपोत्सव स्पर्धेच्या नावाखाली काही जणांकडून भालचंद्र महाराज संस्थान व भालचंद्र महाराजांच्या नावाचा वापर करत पैसे गोळा केले जात आहेत. या प्रकाराला संस्थान कमिटीचा सक्त विरोध आहे व अशा प्रकारे संस्थानाकडून पैसे घेतले जात नाहीत असेही कामत यांनी स्पष्ट केले. तसेच अशा प्रकारांबाबत लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





