मुंबई एकता कल्चर अकादमीचे काव्य पुरस्कार जाहीर

डॉ. निर्मोही फडके, निशिगंधा गावकर, मनीषा शिरटावले यांना पुरस्कार
सिंधुदुर्गातील कवयित्री स्नेहल रावराणे, संचिता चव्हाण, विद्या पाटील यांचाही गौरव
सुमारे 40 वर्ष साहित्य कला क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या मुंबई एकता कल्चर अकादमीच्या वार्षिक साहित्य पुरस्कार योजनेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात ठाणे येथील कवयित्री डॉ. निर्मोही फडके यांना एकता कल्चर काव्य पुरस्कार (3000 रुपये स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ), कणकवली येथील कवयित्री निशिगंधा गावकर यांना समता काव्य पुरस्कार (दोन हजार रुपये स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ) आणि सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांना रमाई माता काव्य पुरस्कार (एक हजार रुपये स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ) जाहीर झाले आहेत. दरम्यान याच कार्यक्रमात कवितेसाठी सिंधुर्गातील कवयित्री स्नेहल रावराणे, संचिता चव्हाण आणि विद्या पाटील यांनाही गौरविण्यात येणार असून ज्येष्ठ कवी अजय कांडर आणि बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य ज्येष्ठ हिंदी अनुवादक डॉ. रमेश यादव यांनी या पुरस्कार योजनेचे परीक्षण केले असल्याची माहिती एकता कल्चरचे अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव आणि उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी दिली.
मुंबई एकता कल्चर अकादमी साहित्य आणि कलाक्षेत्र विविध स्पर्धांचे आयोजन करते. या स्पर्धांना राज्यभरातून अनेक गुणवंत साहित्यिक आणि इतर कला क्षेत्रातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या या काव्य पुरस्कार योजनेसाठी महाराष्ट्रातून 65 कवींनी आपल्या कविता पाठवून प्रतिसाद दिला. यातून डॉ.निर्मोही फडके, निशिगंधा गावकर आणि मनीषा शिरटावले यांच्या कविता पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या. गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार योजनेत सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाच्या उत्तेजनार्थ पारितोषिसाठी एकूण 9 कवींच्या कविता निवडण्यात आल्या असून यात विद्या पाटील - सिंधुदुर्ग, किरण माने- कोल्हापूर, मकरंद हळदणकर- मुंबई, मिलन कांबळे - मुंबई, आरती धारप - रोहा, दीपक करंगुडकर - भायखळा, संचिता चव्हाण - बोरवली, श्रीपाद टेंबे - पुणे, स्नेहल रावराणे - सिंधुदुर्ग आदी कवींचा समावेश आहे. सदर काव्य पुरस्काराचे पारितोषिक वितरण 10 जानेवारी रोजी सायं. 4 वा. मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे एकता कल्चरच्या वार्षिक कार्यक्रमात आयोजित करण्यात आल्याचीही माहितीही प्रकाश जाधव यांनी दिली.





