ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार !

ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात तहसीलदार सचिन पाटील यांची ग्वाही
जेष्ठ नागरिकांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना तुमचे निवेदन देणार आहे. अतिशय कठीण परिस्थितीत शासनाचे सेवक म्हणून तुम्ही काम केलात. एक शासन म्हणून मी तुमचे ऋण व्यक्त करतो, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात केले.
सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन सरन्यायाधिश कै. यशवंतराव चंद्रचुड वगैरे पाच यांच्या खंडपिठाने पेन्शन हा पेन्शनरांचा हक्क आहे असा १७ डिसेंबर १९८२ रोजी ऐतिहासिक निर्णय दिला. तेव्हापासून देशातील सर्व पेन्शनर्स संघटना १७ डिसेंबर हा दिवस ‘पेन्शनर डे’ म्हणून साजरा करतात. सदर दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशन, कुडाळने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद सेवानिवृत्तांचा मेळावा मराठा हॉल कुडाळ येथे रविवारी आयोजित केला होता. या मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते जिल्हा कोषागार अधिकारी संजय घोगळे नायब तहसीलदार अमरसिंह जाधव सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशन, कुडाळचे कार्याध्यक्ष शरद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी असोसिएशनचे सुरेश पेडणेकर, मनोहर सळमळकर, चंद्रकांत अणावकर, रमेश पिंगुळकर, सुभाष गोवेकर, प्रकाश सावंत, आर आर दळवी, उदय कुडाळकर, लक्ष्मीकांत पंडित, अजित गवंडे, चंद्रकांत पाताडे, दिलीप धालवलकर, मीनाक्षी नार्वेकर, वसंत तेली, जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार श्री. पाटील म्हणाले, आजचे संगणक युग आहे. मात्र तुमच्या कालावधीत अतिशय खडतर कालावधी असताना शासनाची सेवा तुम्ही एक सेवक म्हणून केलात हे निश्चित आम्हाला प्रेरणादायी आहे. निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते या प्रश्नांचे निवेदन मी स्वतः जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहे. ज्येष्ठांसाठी शासन सुविधा खूप आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. भविष्यात तुमचे जे काय प्रश्न आहेत त्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.
शासन दरबारी ज्येष्ठावर सातत्याने गेली अनेक वर्ष अन्याय होत आहे विविध प्रश्न मार्गी लागत नाहीत आता 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनानंतर कुडाळ पंचायत समिती समोर नव्हे तर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाच्या समोर धडक आंदोलन मोहीम राबवण्यात येईल असा इशारा असे नेते चंद्रकांत अणावकर यांनी दिला.
श्री घोगळे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडताना शासनाच्या विविध योजना त्यांनी सांगितल्या. वेळीच त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, असे सांगत मार्गदर्शन केले.
असोसिएशनचे जेष्ठ नेते सुरेश पेडणेकर यांनी शासन दरबारी जेष्ठाचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची शासन दखल घेत नाही, म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागते. भविष्यात न्याय्य हक्कासाठी लढा कायम ठेवण्यासाठी संघटितपणा महत्त्वाचा आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर सरमळकर यांनी केले. तर आभार आर आर दळवी आणि मानले.





