बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या 100 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड

कुडाळ : येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, (सीबीएसई बोर्ड) या शाळेने कला स्पर्धा प्रकारात आणखी एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. शाळेतील 100 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर ही निवड करण्यात आली.
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या या रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत सेंट्रल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, हस्ताक्षर, कलरिंग, स्केचिंग, कोलाज तयार करणे, क्राफ्ट अशा विविध कला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवेश मिळवला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कला प्रकारातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगोत्सव सेलिब्रेशन फाउंडेशन मुलुंड, मुंबई या संस्थेतर्फे विविध बक्षीस- पुरस्कारा मार्फत गौरविण्यात येणार आहे.
या यशामध्ये कला शिक्षिका कु. प्राजक्ता मेस्त्री, सौ. पूर्णिमा शिरवलकर तसेच मुख्याध्यापिका सौ. चैताली बांदेकर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपली कला अधिक वृद्धिंगत करण्याची संधी मिळाली.
प्रशालेच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर तसेच शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद व पालकांनी या अभिमानास्पद यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रशालेच्या बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना आकर्षक अशी सन्मानचिन्हे, प्रशस्तिपत्रक व विशेष भेटवस्तू वितरित करण्यात आल्या.





