संगीतकार विजय नारायण गवंडे आणि भाऊ देसाई वसंत देसाई स्मृती पुरस्काराने सन्मानित

वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृती दिनाचे औचित्य

कुडाळ येथील कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांच्या हसे पुरस्कार वितरण

संगीतकार विजय गवंडे आणि भाऊ देसाई यांना या बाबा वर्दम रंगमंचावरून वसंत देसाई यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराचे माझ्या हस्ते वितरण होत आहे, त्याने मी भरून पावले असे भावोद्गार ज्येष्ठ गायक अभिनेत्री फैयाज यांनी काढले. फैयाज यांच्या हस्ते कुडाळ-सोनवडेचे सुपुत्र वसंत देसाई यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या वसंत देसाई स्मृती पुरस्कारांचे वितरण शनिवारी रात्री संगीतकार विजय नारायण गवंडे आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक सहदेव उर्फ भाऊ देसाई यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृती दिनानिमित्त कुडाळच्या बाबा वर्दम स्मृती रंगमंचावर झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. वसंत देसाई यांचे स्नेही प्रदीप देसाई यांच्या तर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातल्या कलाकारांना या पुरस्कार दिला जातो.
२२ डिसेंबर हा संगीतकार वसंत देसाई यांचा स्मृती दिन. याच दिवशी १९७५ मध्ये लिफ्टमध्ये अडकून वसंत देसाई यांचा दुर्दैवी अंत झाला होता. यंदा त्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाली. वसंत देसाई यांचे स्नेही प्रदीप देसाई हे दरवर्षी वसंत देसाई स्मृती पुरस्कारांचं वितरण करतात. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत संगीतकार, गायक, वादक, अभिनेते यांना हा पुरस्कार यापूर्वी वितरित करण्यात आला आहे. यावर्षी सुद्धा २२ डिसेंबरला मुंबई झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पण वसंत देसाई हे ज्या कुडाळ तालुक्यातील आहेत, त्या कुडाळ मध्ये हा पुरस्काराचे वितरण व्हावे अशी इच्छा होती आणि त्यासाठीच संगीतकार विजय नारायण गवंडे आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक सहदेव तथा भाऊ देसाई या दोन वालावलच्या सुपुत्रांना कुडाळ मध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याचे प्रदीप देसाई यान सांगितले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, वसंत देसाई यांच्यावरील पुस्तक आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांनी आपल्यला पहिला मेकअप कुडाळच्या बाबा वर्दम यांनी केला होता त्याची आठवण करून दिली. कोकणात घराघरात कलाकार आहेत. कोकणचा प्रेक्षक सुद्धा रसिक आहे. आम्ही जेव्हा कोकण-गोव्याच्या दौऱ्यावर यायचो तेव्हा आमच्या अनेक नाटकांना येथील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतल्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. जे वसंत देसाई स्वरांच्या हिंदोळ्यावर सर्वाना झुलवत राहिले त्यांना इलेक्टिकच्या झोपाळ्यावर मृत्यू यावा हि गोष्ट दुर्दैवी आहे. वसंत देसाई यांच्या सोबत खूप काम केल्याचं फैयाज यांनी सांगितलं. वसंत देसाई अनेक वादकांना संधी दिली. ते आपल्यासाठी गुरुतुल्य असल्याचं त्या म्हणाल्या. ज्येष्ठ हार्मोनियम वादक पुरुषोत्तम वालावलकर सुद्धा इथले असल्याची आठवण करून दिली.
सत्काराला उत्तर देताना विजय गवंडे यांनी प्रदीप देसाई यांचे आभार मानले. वसंत देसाई यांची गाणी मी शोज मधून बरीच वाजवली आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळतोय याचा आनंद असल्याचे विजय गवंडे म्हणाले. वालावल सारख्या छोट्याशा गावात त्यावेळी भाऊ देसाई यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे होते. आज त्यांच्या सोबत मला हा पुरस्कार मिळतोय याचा आनंद असल्याचे श्री. गवंडे म्हणाले. माझी गाणी लोकांना आवडली त्याचे श्रेय माझ्यावर हाक्के टीका करणारे माझे मित्र आहेत असे सांगून कलाकाराच्या आयुष्यात असे मित्र असावेत याची आठवण करून दिली. आपला प्रवास त्यांनी थोडक्यात उलगडून सांगितला. गीतकार गुरु ठाकूर यांच्या सोबत मालवणी गाणी करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेडु चित्रपटातील देवाक काळजी गाण्याची निर्मिती मागची कहाणी त्यांनी सांगितली. अनेक लोकांना देवक काळजीने प्रेरणा दिली असल्याचे श्री. गवंडे म्हणाले. फैयाज यांच्या सारख्या माऊलीच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतोय याचा आनंद असल्याचे पुरस्कार विजेते भाऊ देसाई म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात वसंत देसाई यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करून झाली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज, संगीतकार विजय नारायण गवंडे, भाऊ देसाई, प्रदीप देसाई, अमेय देसाई यांच्यासह उमेश गाळवणकर, सुनील सौदागर, चंदू शिरसाट, अनंत वैद्य, अमित सामंत, शेखर सामंत, वर्षा वैद्य, केदार सामंत, केदार देसाई, विशाल देसाई, अविनाश वालावलकर आदी उपस्थित होते. योगायोगाने आज विजय गवंडे यांचा वाढदिवस होता, तो देखील केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. कार्यक्रमाला संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!