“एक दिवस स्वराज्याच्या राखणदारासाठी” उपक्रमांतर्गत खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याची करण्यात आली साफ सफाई

किल्ले संवर्धन समिती व मावळे आम्ही स्वराज्याचे टीम चा सहभाग
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खारेपाटण येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिर डोंगरावर व तिथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची व तेथील परिसराची नुकताच झालेल्या दसऱ्याच्या कार्यक्रमानंतर लगेच दोन दिवसात रविवार दि. ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी किल्ले संवर्धन समिती खारेपाटण चे कार्यकर्ते श्री. ऋषिकेश जाधव आणि “मावळे आम्ही स्वराज्याच्या टीम” कडून खारेपाटण किल्ला व येथील परिसराची साफ सफाई व स्वच्छता करण्यात आली.
“एक दिवस स्वराज्याच्या राखण्यासाठी” या उपक्रमांतर्गत खारेपाटण किल्ल्याच्या साफसफाई कराण्याचा उपक्रम किल्ले संवर्धन समितीचे कार्यकर्ते श्री ऋषिकेश जाधव हे गेली १२ वर्षे सलग खारेपाटण येथील दुर्गादेवी मंदिर डोंगर येथील किल्ल्याच्या ठिकाणी राबवत असून यावेळी त्यांच्या सोबत ‘किल्ले खारेपाटण संवर्धन समिती’ चे कृतिशील सदस्य श्री.मंगेश गुरव, महेश उर्फ गोट्या कोळसुलकर,श्री. संतोष पाटील (मालवण एस टी डेपोचे उपक्रमशील कर्मचारी), आदेश उर्फ मुन्ना अफंडकर, श्री. दिगंबर खेतल हे शिवभक्त स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्याचबरोबर किल्ल्याच्या बुरुजाची साफसफाई मोहीम ‘मावळे आम्ही स्वराज्याचे’ या संस्थेचे श्री. दिनेश माने, अक्षय तेली, विशाल माने व अथर्व जाधव यांनी राबवली.
यावेळी कुरंगवणे गावचे सरपंच श्री. संतोष उर्फ पपु ब्रह्मदंडे व उपसरपंच श्री. बबलू पवार यांनीही या स्वच्छता मोहिमेला सदिच्छा भेट दिली. खारेपाटण येथील शाही ऐतिहासिक दसरा सोहळा खारेपाटण दुर्गा देवी मंदिर डोंगर व किल्ला परिसरात साजरा होत असतो. नागरिकांची मोठी गर्दी इथे सायंकाळी असते. तर पतंग उडविण्याचा आनंद यावेळी लुटला जातो. त्यामुळे या परिसरात तुटके पतंग, काठ्या आणि न तुटणारा मांजा दोरा सोबत विविध प्रकारच्या काचेच्या व प्लॅस्टिक बाटल्या, प्लास्टिक ग्लासेस व गुटखा व चिप्सची पाकिटं जास्त प्रमाणात आढळतात.यामुळे हवेत उडणारे पक्षी सरपटणारे प्राणी व पाळीव आणि वन्य प्राणी यांना याचा फटका बसतो किंबहुना त्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे यावेळी आयोजक श्री. ऋषिकेश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान या परिसरात आढळलेला सर्व कचरा एकत्र करून तो जाळून टाकण्यात आला. तर किल्याच्या ताबंदीवर वाढलेली झाडे झुडपे साफ करून किल्ल्याला स्वच्छ करण्यात आले.किल्ले संवर्धन समिती व मावळे आम्ही स्वराज्याचे या टीमच्या कार्यकर्त्यांचे खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
“खरंतर मित्रानो, कुणी गांधी किंवा मोदी सांगतात म्हणून एक दिवस स्टंटबाजी करण्यापेक्षा प्रत्येकाने कुठलंही ठिकाण, वास्तू, दवाखाना, समुद्रकिनारा, किल्ला मनापासून आपले समजून स्वच्छ ठेवले किंवा स्वच्छ केले तर खूप फरक पडू शकतो. व आपला निसर्ग सुंदर राहून पर्यावरण चांगले राहण्यास हातभार लागू शकतो.”





