कणकवलीतील जुन्या भाजी मार्केट इमारतीचा भाग कोसळला

जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार
नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही
कणकवली नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांची भेट घेतली तसेच कोसळलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीनंतर बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले की, “जुने भाजी मार्केटची संपूर्ण इमारत अत्यंत जीर्ण झाली असून तिचे आयुष्य संपले आहे. आज इमारतीचा काही भाग कोसळल्याने संभाव्य धोका अधोरेखित झाला आहे. सध्या काही व्यापारी याच इमारतीत व्यवसाय करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “या इमारतीची केवळ डागडुजी करून प्रश्न सुटणार नाही. सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी झालेली ही इमारत तातडीने निर्लेखित करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची सुरक्षित व्यवस्था केली जाईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येईल. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जीर्ण इमारत हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे.”
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, आबा दुखंडे, जमील कुरेशी, संतोष काकडे, संतोष महाजन, सचिन कुवळेकर, गुरु मोहम्मद शेख, दत्ता प्रसाद बिड्ये, भगवान कासले, संगीता जयताळकर, एजाज काझी, देवराज जाधव, बंडू कोदे, जयवंत जाधव, शेखर बाणे, लक्ष्मण महाडिक, सहिद नाईक, अविनाश गावडे, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपुत आदी उपस्थित होते.





