कणकवलीतील त्या 21 कामांच्या टेंडर चा ठराव तहकुब संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होणार

7 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेश
सत्ताधाऱ्यांकडून फेर निविदा प्रक्रिया करण्याची होती मागणी तर विरोधकांकडून झालेली निविदा प्रक्रिया बरोबर असल्याचा होता दावा
मुख्याधिकाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांना धक्का
कणकवली शहरातील २१ विकास कामांच्या टेंडरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाणार आहे. या संदर्भात कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायत च्या ३०८ कलमनुसार ठरावाच्या स्थगितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. यामध्ये मुख्याधिकारी या अर्जदार तर कणकवली नगराध्यक्ष हे सामनेवाला असणार आहेत. या अर्जाची सुनावणी 7 जुलै रोजी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. याच मुद्द्यावर भाजप नगरसेवक बंडू हर्णे यांनीही गेल्या महिन्यात नगरपंचायत अधिनियम कलम 308 नुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. मात्र इचलकरंजी नगर परिषदेच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला देत फेटाळण्यात आले होते. त्यानंतर नगरपंचायत च्या बैठकीमध्ये या मुद्द्यावरून जोरदार रणकंद झाले होते. भाजपाकडून 21 कामांच्या निविदाना स्थगिती चुकीची असल्याचा मुद्दा मांडला होता. तर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तुमचे अपिल फेटाळण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही वरिष्ठ स्तरावर दाद मागा आता या निविदा तातडीने प्रशासनाने लावाव्यात अशा सूचना दिल्या होत्या. या घडामोडी सुरू असतानाच मुख्याधिकाऱ्यांनी 18 जून 2026 च्या बैठकी मधील विषय क्रमांक 1 ठराव क्रमांक 1 तहकूब करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी अधिनियमा अंतर्गत अर्ज दाखल केल्याने आता या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे ७ जुलैच्या सुनावणीत २१ विकास कामांच्या निविदा प्रक्रिया रद्द होणार की त्याच ठेकेदारांना कामाचा मक्ता मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असताना शहरातील २७ विकास कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. यात २१ कामांसाठी ठेकेदार निश्चित झाले. तर सहा कामांसाठी ठेकेदार उपलब्ध झाले नाहीत. कामे मंजूर झालेल्या ठेकेदारांना कामांची वर्कऑर्डर मिळण्याआधीच कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. निवडणूक निकालामध्ये शहर विकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर कणकवली नगरपंचायतीच्या एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत २१ विकासकामांची निविदा प्रक्रिया रद्द करून, नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. या ठरावाच्या विरोधात भाजपचे नगरसेवक बंडू हर्णे यांनी नगरपंचायत अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. या अपीलाच्या सुनावणीमध्ये नगरसेवक हर्णे यांनी निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्याने त्या रद्द करता येणार नसल्याचा मुद्दा मांडला होता. तर एकाच ठेकेदाराला बहुतांश कामे देण्यात आली आहेत. या ठेकेदाराकडे पूर्वीचीच कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा मुद्दा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वतीने मांडण्यात आला होता. तर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी २१ विकास कामांच्या निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्याचा अहवाल सुनावणी दरम्यान दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या सुनावणी करताना नगरसेवक किंवा शहरातील नागरिकांना नगरपंचायत सभेत झालेल्या ठरावांच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार नसल्याचे कारण देत, ठराव झाल्यापासून तीन दिवसात मुख्याधिकाऱ्यांनी 308 अंतर्गत ठराव तहकूब करण्याकरता अर्ज करण्याची गरज होती. असे सांगत यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला देत बंडू हर्णे यांचे अपील फेटाळून लावले होते.
श्री.हर्णे यांचे अपील फेटाळल्यानंतर १८ जून २०२६ रोजी नगरपंचायतीची पुन्हा सर्वसाधारण सभा झाली. यात ‘शहरातील २१ विकास कामांच्या निविदा रद्द करणे’ असा ठराव घेण्यात आला. मात्र या ठरावाची अंमलबजावणी तहकूब करावी याबाबतचा अर्ज मुख्याधिकाऱ्यांनी २४ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला. त्या पार्श्वभूमीवर विनायक औंधकर सहाय्यक आयुक्त नगर विकास शाखा यांनी या अर्जाची सुनावणी ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निश्चित केली आहे. यात कणकवली नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना आवश्यक माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान १८ जून रोजी झालेल्या नगरपंचायत सभेत ‘शहरातील २१ विकास कामांच्या निविदा रद्द करणे आणि पुढील तीन दिवसांत नव्याने निविदा प्रक्रिया राबविणे’ असा देखील ठराव करण्यात आला होता. मात्र या ठरावाच्या विरोधात मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. त्यामुळे त्या २१ विकासकामांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी व मुख्याधिकारी यांच्यातील कायदेशीर लढाई आता यानिमित्ताने समोर आली आहे. शहरातील २१ विकासकामांचा मुद्दा शहर विकास आघाडी आणि भाजपच्या नगरसेवकांनी प्रतिष्ठेचा केला आहे. शहरातील या २१ विकासकामांमध्ये तेलीआळी ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुरूस्ती, बांधकरवाडी येथील पाणंद, एस.टी.कार्यशाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती, निम्मेवाडी, परबवाडी, कनकनगर, शिवाजीनगर, टेंबवाडी येथील रस्त्यांची दुरूस्ती आणि शहरात ठिकठिकाणी हायमास्ट, गटार बांधकामे यांचा समावेश हाेता. मात्र राजकीय साठमारीत गेल्या सहा महिन्यात ही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे शहराच्या अनेक वाड्यांतील नागरिकांना खड्य्यातूनच जा ये करावी लागत आहे. त्यामुळे आता याबाबतचा काय निर्णय होतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





