शेतीत AI तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पद्ध्तीचा अवलंब करा – प्रमोद कामत

कृषी दिनी आंबडपालमध्ये ‘बळीराजाचा जागर’

आंबडपाल येथे जिल्हास्तरीय कृषि दिन उत्साहात साजरा

शेतकऱ्यांनी कृषीयोजनांचा लाभ घ्यावा, जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळावं. शेतीमध्ये एआय तंत्राचा वापर करावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कृषिदिन आणि शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात कुडाळ तालुक्यात आंबडपाल येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री. कामत बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा हा शेती बागायती आणि मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो. जि. प. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाठी नेहमीच कट्टीबद्द आहे, असेही श्री. कामत यांनी सांगून जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. मध्ये कृषी सहाय्यक यांना जि. प. माध्यमातून कायमस्वरूपी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आंबडपाल येथील श्री देवी भद्रकाली मंदिराच्या नजीक सभागृहात आज कृषी दिन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.
जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, जि. प. मुख्यकार्यकारी रवींद्र खेबुडकर, कुडाळ पं. स. सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली,सामाजिक कार्यकर्ते प्रभाकार सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल फुंड, जि. प. समाजकल्याण सभापती रोहिता तांबे, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी ऋषिकेश गावडे,शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, जि. प. सदस्य रुपेश कानडे, गंगाराम सडवेलकर, दीपक नारकर, सदस्या आरती पाटील, पं. स. सदस्य मंगेश प्रभू, अमित भोगले, नितीन म्हाडेश्वर, पं. स. सदस्या करुणा पावसकर, अर्चना बंगे,आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, विनायक राणे, प्रगतशील शेतकरी तानाजी सावंत, रामचंद्रपंत वालावलकर यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी मेळाव्याची सुरुवात गोमातेची पूजा करून व देवी भद्रकालीच्या मंदिरात मान्यवरांच्या हस्ते बळी राजाला सुखी राखण्याचे गाऱ्हाणे घालून व पेढे ठेऊन करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत प्रा. शाळा आंबडपाल येथील जि प शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून केले. मेळाव्याचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत व जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक व भगवान बलराम यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच मृदा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जि. अध्यक्ष श्री. कामत यांचा जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह व सुपारी रोप देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. कामत म्हणाले, जि. प. मार्फत कृषी बागायती वीज योजनेचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो. लोकांचे कृषीधन वाढविण्यासाठी कृषी योजनांची अंबलजावणी करून कृषीमार्फत लोकांचा आर्थिक फायदा कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक फायदेशीर व्हावी आणि युवा पिढी शेतीकडे अधिक आकर्षित व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र काम करूया, असे आवाहन त्यांनी केलं. श्री. कामत पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेमार्फत हा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेले निर्णय आजही आपल्याला आनंददायी व प्रेरणादायी आहेत. बदलते हवामान, उत्पादनात वाढलेला खर्च, बाजारपेठेतील स्पर्धा आव्हाने यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. या अडचणीसमोर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, जलसंवर्धन, पीक मूल्यवर्धन यावर भर देणे काळाची गरज आहे.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे व दीपक केसरकर यांना अधिवेशन असल्यामुळे येता आले नाही. परंतु शेतकरी मेळाव्यासाठी त्यांनी तुम्हा शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, असे सांगून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी शेती क्षेत्राकडे वळावे असे आवाहन केले. पालकमंत्री हे एआयच्या माध्यमातून अनेक योजना या जिल्ह्यात आणत आहेत. शासकीय कामात एआयचा वापर होतो तसाच तो शेतीमध्ये करून आपल्या फळबागायतीचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रभाकर सावंत म्हणाले, कृषी प्रधान देश असलेल्या भारताचे आपण नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आज परिस्थिती बदलली असली तरी भारत हा आयातीकडे न गेलेला स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर असलेला देश आहे. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचा आज शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आपली पूर्वीची शेतीची अवजारे काय होती याचे प्रदर्शन आपल्याला आज ठेवावे लागत आहे. पुढच्या कालावधीत हे दिन नुसते उत्सव म्हणून साजरे करावे लागणार आहेत. जुन्या वस्तू ओळखणारी पिढी आता संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण पिढीने शेतीकडे वळले पाहिजे ही काळाची गरज आहे. पुढच्या काळात विषमुक्त अन्नधान्य हवे असेल तर पुन्हा 60-70 वर्षाचा आपला नैसर्गिक प्रयोग होता त्याच्याकडे पुन्हा वळणे काळाची गरज आहे. जमिनीची सुपिकता वाढवायची असेल, समाजाला निरोगी आणि पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी नैसर्गिक व प्राकृतिक शेतीकडे वळले पाहिजे. रासायनिक शेतीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास निसर्गाचे क्षेत्र बदलत चालले आहे हे थांबवायचे असेल तर शेतीची व्यापक चळवळ झाली पाहिजे, असे श्री. सावंत यांनी सांगितले.
रवींद्र खेबुडकर म्हणाले, जि. प. यंत्रणा अपेक्षित काम करीत आहे. पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी लोकांचे जीवनमान वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सिंधुदुर्ग अनेक ठिकाणी शेतीची पड जागा आहे. त्याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. महिला वर्ग आज शेतीकडे वळत आहेत हा चांगला संकेत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भात पीक स्पर्धेत तालुका आणि जिल्हास्तरावर क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हास्तरावर आनंद रामचंद्र सावंत (आंब्रड-कुडाळ), गोविंद सदाशिव धुरी (आंबडोस-मालवण), सुनील विष्णू सावंत (फणसनगर–कणकवली), तर तालुकास्तरावर उत्तम बाबुराव देसाई (धुरीटेम्बनगर पिंगुळी), नागेश चंद्रकांत सावंत (जांभवडे-कुडाळ), बाबली गणेश परब (तेंडोली-कुडाळ) याना प्रमाणपत्र आणि सुपारीचे रोप देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी श्री पद्धतिने भात लागवड करणायच प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आले. मंदिर परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आली. शेतकऱ्यांना डॉ. विजय दळवी यांच्या सारख्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन देखील केल. प्रास्ताविक सचिन कांबळे यांनी केलं तर सुत्रसंचालन अमित तेंडोलकर यांनी केलं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद अधिकरी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!